प्रचारासाठी रशियन तरुणींचा डान्स ठेवायचा आहे, उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:09 AM2023-05-04T08:09:41+5:302023-05-04T08:11:20+5:30
UP Local Election 2023: एका उमेदवाराने रिटर्निंग ऑफिसला पत्र लिहिले आहे. तसेच प्रचारामध्ये रशियन तरुणींचा डान्स ठेवण्यासाठी मतदारांना दारू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रामधून केली आहे.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. महापौर पदाच्या उमेदवारांसोबतच सभासद पदाचे उमेदवारही कुठलीही कसर बाकी ठेवत नाही आहेत. मतदारांना कसं खूश ठेवायचं याचाच विचार उमेदवारांकडून सुरू आहे.
अशीच एक घटना कानपूरमध्ये दिसून आली आहे. येथील आंबेडकरनगर मध्ये एका उमेदवाराने रिटर्निंग ऑफिसला पत्र लिहिले आहे. तसेच प्रचारामध्ये रशियन तरुणींचा डान्स ठेवण्यासाठी मतदारांना दारू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रामधून केली आहे. हे पत्र व्हायरल झाल्यावर अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तर या दरम्यान, एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. त्यात रशियन तरुणी डान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ काकादेव ठाणे क्षेत्रातील आंबेडकरनगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सभासद पदासाठी अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या संजय दुबे यांनी हा डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता, असे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकाऱ्यांनी चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त बी.पी. जोगदंड यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच एसीपी स्वरूपनगर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र लोकमत या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कुठलाही दुजोरा देत नाही.