Akhilesh Yadav: युपी हातचे गेले! अखिलेश यादव मोठ्या पेचात; आमदारकी ठेवायची की खासदारकी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:02 PM2022-03-12T13:02:48+5:302022-03-12T13:03:28+5:30
Uttar Pradesh Politics: शेतकरी आंदोलन, युपीतील राजकारण्यांनी चालविलेली गुंडगिरी आदींमुळे पुन्हा राज्य हाती येईल असे त्यांना वाटत होते. यामुळे अखिलेश यादव यांनी आमदारकी लढविली. जिंकलेही, परंतू आता ते मोठ्या पेचात सापडले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने मोठ्या बहुमताने सत्ता राखली आहे. सपाचे अखिलेश यादव यांनी राज्यात भाजपा विरोधी वारे पाहिले होते. शेतकरी आंदोलन, युपीतील राजकारण्यांनी चालविलेली गुंडगिरी आदींमुळे पुन्हा राज्य हाती येईल असे त्यांना वाटत होते. यामुळे अखिलेश यादव यांनी आमदारकी लढविली. जिंकलेही, परंतू आता ते मोठ्या पेचात सापडले आहेत. आजम खान आणि अखिलेश हे लोकसभेचे खासदार आहेत. दोघेही विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. यामुळे खासदारकी ठेवायची की आमदारकी या पेचात सपा अडकला आहे.
लोकसभेत सपाचे पाच खासदार आहेत. अशावेळी दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला तर ते सपाला परवडणारे नाही. कारण सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे पालटले आहे. लोकसभेची पोटनिवडणूक लागली तर सपाला दोन्ही जागा गमवाव्या लागू शकतात.
तर राज्यात विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणतरी खमका हवा आहे. कारण राज्यात पुन्हा लोकसभा आणि पाच वर्षांनी विधानसभा निवडणूक होईल तेव्हा देखील भाजपाला पुरेशी ताकद निर्माण करावी लागणार आहे. सपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्याने मुख्य विरोधी पक्ष तोच असणार आहे. अशावेळी विरोधी पक्षनेता तेवढ्याच ताकदीचा लागणार आहे. यामुळे खासदारकी सोडून अखिलेश यादव आमदार होणार की आमदारकी सोडून खासदारच राहणार याबाबत युपीमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
यावर सपातील सुत्रांनी अखिलेश यादव आणि आझम खान हे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे अखिलेश जिंकलेल्या करहल मतदारसंघात आणि आझम खान जिंकलेल्या रामपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे या जागा सपा राखण्यात यशस्वी ठरते की भाजपा आपल्याकडे खेचते हे येणारा काळ ठरविणार आहे.