UP Election : आता उत्तर प्रदेशच्या निवडणूक रणात उतरणार ममता; भाजपचं टेन्शन वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:00 PM2022-01-18T20:00:18+5:302022-01-18T20:00:45+5:30
गरज भासल्यास उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यातच म्हटले होते.
यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आता समाजवादी पक्षाला तृणमूल काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला आहे. टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत यूपीमध्ये मते मागताना दिसतील. 8 फेब्रुवारीला ममता बॅनर्जी राजधानी लखनौमध्ये सपासाठी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमाने संबोधित करतील. याशिया, ममता पीएम मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही ऑनलाइन प्रचार करतील.
यापूर्वी, TMC आणि सपा एकत्रितपणे सार्वजनिक रॅली करतील आशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु कोविड-19 साथीच्या आजारामुळे निवडणूक आयोगाने लादलेल्या निर्बंधांमुळे ही योजना रद्द करण्यात आली. खरे तर, निवडणूक आयोगाने रोड शो आणि रॅली यांसारख्या राजकीय हालचालींवर 22 जानेवारीपर्यंत बंदी वाढवली आहे. आयोग 22 जानेवारी रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेईल, तोपर्यंत राजकीय पक्षांना डिजिटल प्रचार करावा लागेल.
गरज भासल्यास उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यातच म्हटले होते. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला आहे आणि 10 मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.