रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:08 IST2025-03-28T14:06:40+5:302025-03-28T14:08:42+5:30

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावर आणि छतावर नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

UP Meerut police has issued instructions to not offer namaz on the streets | रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

UP Police on Offering Namaz: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये पोलीस प्रशासनाने ईदच्या नमाजबाबत कडक आदेश जारी केले असून रस्त्यावर नमाज अदा करण्यास बंदी घातली आहे. आता या आदेशावरून देशभरात राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता. त्यावेळी झालेल्या दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशील असलेल्या संभलमध्ये प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. 

रमजानच्या शेवटच्या शुक्रवारच्या नमाजच्या आधी मेरठ पोलिसांनी रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. नियम मोडल्यास पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतात, असंही पोलिसांनी सांगितले. ईदची नमाज स्थानिक मशिदींमध्ये किंवा  ईदगाहांमध्ये अदा करावी आणि कोणीही रस्त्यावर नमाज अदा करू नये, असं मेरठचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले होते.

संभलमधील वातावरण लक्षात घेऊन प्रशासनाने बुधवारी ईद, गुडफ्रायडे, नवरात्री आणि रामनवमीच्या संदर्भात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. बैठकीत सर्व सण पारंपारिक पद्धतीने शांततामय वातावरणात पार पाडले जातील, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले. मात्र यावेळी रस्त्यांसह गच्चीवर नमाज अदा करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मुस्लीम पक्षाला सांगितले. मात्र घरांच्या गच्चीवर नमाज अदा करण्यावर बंदी घालण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवत हे संविधानाचे उल्लंघन होत असल्याचे म्हटलं.

ईदच्या दिवशी धर्मगुरु आणि इमाम यांना त्यांच्या जवळच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत नमाज अदा केली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल आणि पासपोर्ट आणि परवाने रद्द केले जाऊ शकतात, असे स्पष्ट आदेश पोलिसांनी दिली आहेत.

संभलचे खासदार झिया उर रहमान बर्क यांनी प्रशासनाच्या घरांच्या छतावर नमाज अदा करण्यावर बंदी घालण्यावरुन प्रश्न उपस्थित केला. लोकांना त्यांच्या घराच्या गच्चीवर नमाज अदा करण्यापासून रोखण्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. गच्ची ही कोणत्याही सरकारची, नगरपालिका किंवा गावातील सोसायटीची जमीन नाही. छत ही वैयक्तिक जागा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरी नमाज पढली नाही तर तो कुठे जाणार? असे निर्बंध आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात आहेत, असं सपा खासदाराने म्हटलं.

Web Title: UP Meerut police has issued instructions to not offer namaz on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.