अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:58 PM2022-05-12T15:58:55+5:302022-05-12T16:00:01+5:30
Tax Relief for Ayodhya Temples : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे.
अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकारामुळे अयोध्येतील मंदिरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या येथील मठ-मंदिरांवरील कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव अयोध्या महानगरपालिकेने मंजूर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे. मठ- मंदिरांना आता फक्त प्रतिकात्मक कर द्यावा लागेल. ज्या सर्व मठ, मंदिर आणि आश्रमांचा कर माफ करण्यात आला आहे, ते व्यावसायिक उपयोग करत नाहीत. तसेच, मंदिरांवर असलेला थकित कर सुद्धा माफ करण्यात आला आहे.
यासंदर्भात उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. सुरेश कुमार खन्ना यांनी म्हटले आहे की, "अयोध्येत मठ-मंदिर कर, थकित कर सुद्धा माफ".
मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की, मंदिर आणि धर्मशाळांचा कर माफ केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता महानगर पालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. महानगर पालिकेच्या महापौरांनी सांगितले की, नगरसेवक अर्जुनदार आणि रमेशदास यांच्या प्रस्तावावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिरांचे थकित कर सुद्धा माफ केले आहे.