उत्तर प्रदेश पोलिसांचा पराक्रम; चोरीच्या प्रकरणात आरोपीऐवजी न्यायाधिशाचा शोध केला सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:39 IST2025-04-14T18:32:38+5:302025-04-14T18:39:56+5:30
उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायाधिशाला चोर समजून कारवाई केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांचा पराक्रम; चोरीच्या प्रकरणात आरोपीऐवजी न्यायाधिशाचा शोध केला सुरु
UP Police:उत्तर प्रदेशपोलिसांच्या एका हास्यास्पद कामगिरीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशातपोलिसांनी एका आरोपीला अटक करण्याऐवजी चक्क महिला न्यायाधिशाला ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरु केली होती. काही वेळासाठी महिला न्यायाधिशाला हा सगळा प्रकार बघून धक्काच बसला होता. मात्र त्यानंतर महिला न्यायाधिशाने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पोलीस अधिकाऱ्याने चोरीच्या आरोपींना शोधण्याऐवजी थेट न्यायालयाच्या न्यायाधीशांना आरोपी बनवले. बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, न्यायालयाने चोरीचा आरोपी राजकुमार उर्फ पप्पूविरुद्ध सीआरपीसीच्या कलम ८२ अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी करुन न्यायालयात हजर राहण्यासाठी निर्देश दिले होते. मात्र संबधित अधिकाऱ्याने आपलं डोकं वापरुन हा आदेश जारी करणाऱ्या महिला न्यायाधिशालाच आरोपी बनवले.
उपनिरीक्षक बनवारीलाल या अधिकाऱ्याने अजामीनपात्र वॉरंट घेऊन न्यायाधीश नगमा खान यांचा शोध सुरु केला. २३ मार्च रोजी जेव्हा हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला तेव्हा हा धक्कादायक खुलासा झाला. पोलीस अधिकाऱ्याने अहवालात 'आरोपी नगमा खान तिच्या घरी आढळली नाही, कृपया पुढील कारवाई करा, असे लिहीले होते. न्यायालयाने या निष्काळजीपणाला गांभीर्याने घेतले. अहवालात आरोपीच्या जागी न्यायाधीशाचे नाव पाहिल्यानंतर न्यायाधीश नगमा खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) नगमा खान पोलिसांवर चांगल्याच संतापल्या. पोलिसांच्या या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले."ज्या अधिकाऱ्याला कारवाई करायची होती त्याला ना प्रक्रिया समजते आणि ना आदेश कोणाविरुद्ध आहे हे माहित आहे. हा कर्तव्यातील स्पष्ट निष्काळजीपणा आहे," असे नगमा खान यांनी म्हटले. नगमा खान यांनीनी पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आग्रा रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली. आता या प्रकरणाची सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.