UP Assembly Election 2022 : यूपीत अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:34 PM2022-01-26T21:34:26+5:302022-01-26T21:39:10+5:30
२५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी शाह यांनी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे (Uttar Pradesh Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातून होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात जाट व्होट बँकेचा मोठा प्रभाव आहे. यामुळे आपली स्थिती अनुकल करण्याच्या उद्देशानं भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी दिल्लीत (Delhi) जाट नेत्यांची भेट घेतली. भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त २५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं.
यावेळी संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. “उत्तर प्रदेशातूनच तिन्ही राष्ट्रीय निवडणुकांमध्ये जाट समाजानं भाजपची खुप मदत केली आहे आणि विजयही मिळवून दिलाय. जाट आणि भाजपमध्ये अनेक साम्य आहे. भाजप आणि जाट राज्याच्या प्रगतीचा आणि शेतकऱ्यांचा विचारही करतात. दोघेही देशाच्या सुरक्षेचाही विचार करतात. वन रँक वन रँक पेन्शन देण्याचे काम आम्ही वर्षानुवर्षे केले. जाट प्रवर्गातूनच भाजपने तीन राज्यपालही दिले आणि ९ जणांना खासदार केलं. चौधरी चरणसिंग यांच्यानंतर सर्वाधिक आम्ही दिलंय," असंही त्यांनी नमूद केलं.
राहुल गांधींवरही निशाणा
आम्ही शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटी माफ केले. उसाच्या पैशांबद्दल थोडीफार उणीव असेल ती लवकरच दूर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "राहुल गांधींना खरीप आणि रबी पिकांमधला फरकही माहित नाही. अखिलेश यादर सरकारदरम्यान ४२ ऊस कारखाने होते, पण त्यापैकी२२ बंद करण्यात आले. योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशात एकही हिंसाचार झाला नाही," असंही शाह म्हणाले.
Delhi | Union Home Minister Amit Shah reaches residence of BJP MP Parvesh Sahib Singh Verma on the occasion of #RepublicDaypic.twitter.com/eELELAcJTe
— ANI (@ANI) January 26, 2022
जयंत यांच्यासाठी दरवाजा खुला
सपा आणि आरएलडीचे सरकार बनले तर आरएलडीचं नाही, तर अखिलेश यांचंच चालेल. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात. मला कधीही फटकारा पण भाजपला मत द्या. मी पुन्हा सांगतो जयंत यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. आता काही होऊ शकत नाही. परंतु २०२४ साठी त्यांना समजवा. जर कोणताही वाद असेल तर सोबत बसून सोडवू, बाहेरून कोणालाही बोलावण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं.
जयंत चौधरी यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. समाजाचे लोक त्यांच्याशी बोलतील, समजावतील. भाजपचा दरवाजा त्यांच्यासाठी कायमच खुला आहे. त्यांनी आमच्याकडे यावं असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्यांनी निराळा मार्ग निवडल्याचं शाह म्हणाले.