पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:37 IST2024-09-28T16:30:03+5:302024-09-28T16:37:27+5:30
पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर पाहायला आहे. गेल्या ४८ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये अपघात होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेशातील ५८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तर सुलतानपूरच्या लांबुओ येथे सर्वाधिक २७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी वीज पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच सीतापूरमधील ३०० हून अधिक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गवाहिया गावात घराची भिंत कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
पावसाने केला कहर
अयोध्येतील परिस्थितीही अत्यंत वाईट होती, या हंगामातील सर्वाधिक १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथे घराचे छत कोसळले असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ललितपूर आणि फतेहपूरमध्येही वीज पडून एक मुलगी आणि एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. आंबेडकरनगरमध्ये वीज पडल्याने चार बहिणींचा मृत्यू झाला.
शाळेचा परिसर जलमय
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आंबेडकरनगर येथील कस्तुरबा गांधी शाळेचा परिसर जलमय झाला होता. अनेक शासकीय कार्यालये आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
आजही हवामान खात्याने राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नागरिकांना घरातमध्येच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.