UP Rajyasabha Election: डिंपल यादवांचा राज्यसभेचा पत्ता कापला; अखिलेशनी विधानसभेला साथ देणाऱ्याला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:40 AM2022-05-26T11:40:53+5:302022-05-26T11:41:35+5:30
युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत.
राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधून सपाने तीन उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना उमेदवारी देऊन सपाने धक्का दिला होता. अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यादवांना देखील उमेदवारी दिला होती. मात्र, आज त्यांनी आणखी एक धक्का देत डिंपल यांचा पत्ता कापला आहे.
डिंपल यांच्या ऐवजी राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी सपाच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणूक लढविणार आहेत. सिब्बल यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी आपण १६ मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत. नाराज असलेले सपा आमदार आझम खान यांचे सिब्बल वकील होते. आझम खान आणि काका शिवपाल यादव यांच्या बंडखोरीच्या भूमिकेला अखिलेश यांनी चाप लावला आहे. शिवाय राज्यसभेतही सिब्बल यांच्या रुपाने सपाला मोठा आवाज मिळाला आहे.
युपीतील एकूण ११ जागांपैकी भाजपा ७ आणि सपा १ जागा जिंकू शकते. चौधरी यांनी सपासोबत विधानसभेची निवडणूक लढविली होती. डिंपल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. परंतू ऐनवेळी चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयंत चौधरी यांना सपाने धोका दिला अशी चर्चा होऊ लागली होती. यामुळे सपाने एकमेव मित्रपक्ष असल्याने चौधरींना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. आता डिंपल यादव यांना आजमगढ़ लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.