Rampur By Election Live: आझम खानच्या रामपूरमध्ये गेम पालटला, भाजप उमेदवाराने घेतली 12 हजार मतांची आघाडी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:12 PM2022-12-08T15:12:21+5:302022-12-08T15:13:02+5:30
Rampur By Election Live: उत्तर प्रदेशातील रामपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत राजकीय चित्र बदलताना दिसत आहे.
Rampur By Election Result :उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध रामपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत अचानक राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. मतमोजणीच्या 26व्या फेरीनंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आकाश सक्सेना यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर सुमारे 12 हजार मतांची आघाडी घेतली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आकाश सक्सेना यांना 50,435 आणि असीम राजा यांना 38,632 मते मिळाली आहेत.
सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर असीम रझाने शानदार पुनरागमन केले होते. मात्र, आता भाजपच्या उमेदवाराने पुनरागमन केले असून विजयाकडे वाटचाल करत आहे. रामपूर बाहुबली नेता आझम खान याची पारंपारिक सीट आहे, त्यामुळेच राज्यातील प्रत्येकाची नजर या पोटनिवडणुकीवर आहे. आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक लागली होती.
आझम खानसाठी प्रतिष्ठेची लढाई
5 डिसेंबर रोजी झालेल्या रामपूर विधानसभा मतदारसंघात 33 टक्के मतदान झाले होते. आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. आझम खान यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. अशा स्थितीत या जागेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला होता. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून रामपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.
रामपूर कोण जिंकणार?
रामपूरमध्ये यावेळी अत्यल्प मतदान झाल्यामुळे भाजप आशावादी आहे, तर समाजवादी पक्षाच्या छावणीत प्रचंड निराशा आणि अस्वस्थता आहे. रामपूर अशी जागा आहे जिथे 55 ते 60 टक्के मुस्लिम मतदार आहेत आणि यावेळी मतांची टक्केवारी सर्वात कमी नोंदवली गेली आहे. रामपूर जागेवर केवळ 33-34 टक्के मतदान झाले, त्यामुळे आझम खान यांच्याविरोधात मुस्लिमांची नाराजी उघड झाल्याचे दिसत आहे.