UP Result: युपीच्या निकालावर सट्टा बाजार तेजीत, भाजपच्या 'फ्लावर'ला पसंती, सायकलची गच्छंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:23 PM2022-03-09T16:23:18+5:302022-03-09T16:25:56+5:30
UP Result: समाजवादी पक्षाची आघाडी आणि अखिलेश यादव हे सट्टाबाजारात अग्रस्थानी होते, पण तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर सपाची सायकल मागे पडली.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या जनतेने पुढील पाच वर्षांसाठी कुणाच्या हाती सत्ता सोपवली? या प्रश्नाचे नेमके उत्तर 10 मार्चला होणाऱ्या मतमोजणीनंतरच मिळेल. या मतमोजणीला आता काही तासच उरले असताना युपीतील निकालावर सट्टा बाजारात चांगला भाव वाढल्याचे समजते. दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, इंदौरपासून ते अहमदाबादपर्यंत युपीच्या निवडणूक निकालावर सट्टा लागला आहे. त्यात, भाजपा आणि समाजवादी पक्षात कोण सत्तेची खुर्ची जिंकणार, यावर सट्टेबाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
समाजवादी पक्षाची आघाडी आणि अखिलेश यादव हे सट्टाबाजारात अग्रस्थानी होते, पण तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर सपाची सायकल मागे पडली. सद्यस्थितीत योगी आणि भाजपवर अनेकांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युपी निवडणुकीवर आत्तापर्यंत 500 कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याचे वृत्त अमर उजाला या दैनिकाने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडे जोर वाढत असून सपाचा जोर कमी झाला आहे. त्यातच, एक्झिट पोलच्या निकालानंतर भाजप आणि योगी आदित्यनाथांचीच सट्टाबाजारात चलती असल्याचं समजतंय.
सट्टाबाजारात सध्या सपाचा भाव 1 ला तीन म्हणजे 3200 रुपये लावल्यास 10 हजार रुपये मिळणार, असा आहे. एक्झिट पोलनंतर सपाची आकडेवारी कमी आल्याने तिप्पट भाव मिळत असतानाही समाजवादी पक्षाच्या बाजुने कोणीही पैसे लावायला तयार नाही. भाजपच्या बाजुने 100 ला 130 चा भाव आहे, भाजपवर सध्या कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागत असल्याचेही सट्टा बाजारातील सुत्रांकडून समजत आहे.
सट्टा बाजारातील अंदाज
भाजप युतीला 238-240 जागा
केवळ भाजपच्या जागा 200
सपाला जागा 120-145
बसपा 10-25 जागा
काँग्रेस 02-06 जागा
तर योगी 15 वर्षानंतर पहिले मुख्यमंत्री
दरम्यान, जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्ण बहुमताने आपले सरकार स्थापन करेल, असा दावा करण्यात आला आहे. या एक्झिट पोलचे आकडे, प्रत्यक्ष निकालात रुपांतर झाले, तर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याच वेळी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर किमान 3 विक्रमांचीही नोंद होईल. उत्तर प्रदेशात भाजपने सत्ता जिंकली तर, योगी आदित्यनाथ हे 15 वर्षांनंतर यूपीचे विधानसभा सदस्य असलेले मुख्यमंत्री होतील. 2017-22 च्या कार्यकाळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. अखिलेश यादवही विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच मुख्यमंत्री झाले होते.