स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी कोर्टात गेला अन् अधिकऱ्यांसमोरच प्राण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 04:54 PM2022-11-18T16:54:21+5:302022-11-18T16:54:48+5:30
वृद्धाला अधिकाऱ्यांनी कागदावर मृत घोषित केले, 6 वर्षांपासून लढत होता लढाई.
उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कागदावर मृत घोषित केलेला वृद्ध व्यक्ती, स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात पोहोचला, पण त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 70 वर्षीय वृद्ध गेल्या 6 वर्षांपासून स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची लढाई लढत होता. खेलई नावाच्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी 6 वर्षांपूर्वी कागदावर मृत घोषित केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये खेलई यांचा मोठा भाऊ फेलई यांचा मृत्यू झाला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी चुकून फेलईऐवजी खेलईचे नाव कागदपत्रांमध्ये लिहिले. तेव्हापासून खेलई स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी लढा देत होते. ते धनघाटा तालुक्यातील कोदरा गावचे रहिवासी होते. लेखपाल व इतर तहसील कर्मचाऱ्यांच्या चुकीची शिक्षा खेलई यांना मिळाली. स्वत:ला जिवंत असल्याचे सांगण्यासाठी खेलई कोर्टात पोहोचले, मात्र अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
संपत्तीदेखील दुसऱ्याला गेली
सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे खेलई यांची संपत्ती फेलईच्या पत्नीने बळकावून घेतली. खेलई यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली, तेव्हापासून ते एसडीएम, तहसीलदार यांना भेटून जिवंत असल्याचे सांगत होते. पण, कोणत्याच अधिकाऱ्याने त्यांचं ऐकून घेतलं नाही. अखेर त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पण, अधिकाऱ्यांसमोरच त्यांचा जीव गेला.