मुलांनी मालमत्ता नावावर करण्याचा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना संपवले; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:32 IST2025-04-10T20:30:27+5:302025-04-10T20:32:02+5:30
उत्तर प्रदेशात मुलांनीच वडिलांची हत्या करुन बनाव रचल्याचे समोर आले आहे.

मुलांनी मालमत्ता नावावर करण्याचा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना संपवले; दोघांना अटक
UP Crime:उत्तर प्रदेशात संपत्तीसाठी मुलांनीच वडिलांची कट रचून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बुलंदशहरमध्ये दोन भावांनी गळा दाबून वडिलांची हत्या केली. दहा दिवसांनी या हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पाहून मुलांनी वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. वडील जमीन विकून टाकतील या भीतीने मुलांनी टोकाचे पाऊल उचलले.
बुलंदशहरातील धनौरा गावात एका रिकाम्या जागेत एक मृतदेह सापडला होता. पोलिसांच्या तपासात मुलांनीच वडिलांचा खून केल्याचे समोर आलं आहे. पोलिस पथकाने वडिलांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन मुलांना अटक केली आहे. आरोपी मुलांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हत्येत वापरलेला स्कार्फ, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. २ एप्रिल रोजी सत्यवीर याचा मृतदेह गावातील मंदिराजवळील कालव्याच्या काठावर एका रिकाम्या जागेत सापडला होता.
सत्यवीर यांचा मुलगा इंद्रजित याने काकोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना धक्का बसला. सत्यवीर याच्या नावावर ३८ बिघा जमीन होती. त्याला दारू पिण्याचे, जुगार खेळण्याचे व्यसन होते. त्याची दोन्ही मुलं इंद्रजित उर्फ बिट्टू आणि जॅकी यांना भीती होती की वडील जमीन विकतील. याच कारणामुळे दोघांनीही त्यांच्या वडिलांचा खून करण्याचा कट रचला.
दोन्ही मुलांनी ठरल्याप्रमाणे वडिलांचा काटा काढला. १ एप्रिल रोजी सत्यवीर दारू पिऊन घरी पोहोचला तेव्हा त्याचा मोठा मुलगा इंद्रजितने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेवणानंतर सत्यवीर झोपी गेला तेव्हा त्याच्या दोन्ही मुलांना स्कार्फने गळा दाबून त्याला ठार मारले. हत्येनंतर दोन्ही भाऊ मृतदेह मोटारसायकलवरून घेऊन गेले. गावातील मंदिराजवळील नदीकाठी असलेल्या एका रिकाम्या जागेत मृतदेह फेकून दिला. त्यांना हा अपघात असल्याचे भासवायचे होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.
पोलिसांना मुलांनी १ एप्रिलच्या रात्री वडील सत्यवीर शेतावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्याचे सांगितले. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परतले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना वडिलांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा इंद्रजित आणि जॅकीचे म्हणणे वेगळे होते. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली तेव्हा प्रकरण उघडकीस आले. खून करण्यापूर्वी, दोन्ही भावांनी यूट्यूबवर 'वडिलांच्या हत्येनंतर मालमत्ता मुलांच्या नावावर कशी हस्तांतरित होते' हा व्हिडिओ सात वेळा पाहिला असल्याचे तपासात समोर आले.