तरुणांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा, 'या' क्षेत्रात बंपर नोकऱ्या देणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:49 AM2022-08-31T07:49:48+5:302022-08-31T07:50:32+5:30
Yogi Adityanath : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 हजार पदांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचेयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार येत्या 5 वर्षांत वैद्यकीय शिक्षण विभागात 57 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 हजार पदांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी अनेक कामे केली आहेत.
सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. हे पाहता एक जिल्हा, एक वैद्यकीय महाविद्यालय या धोरणावर काम सुरू आहे. योगी 2.0 च्या 100 दिवसांमध्ये संभल आणि महाराजगंज जिल्ह्यातील दोन वैद्यकीय महाविद्यालयांशीही सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच अन्य दोन जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांचा सामंजस्य करार होणार आहे.
येत्या पाच वर्षांत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 57 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी 2021 मध्ये 45,127 पदांच्या भरतीला मंजुरी दिली होती, ज्यावर विविध टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास पाच हजार पदांसाठी भरती पूर्ण झाली आहे.
वैद्यकीय शैक्षणिक प्रधान सचिव आलोक कुमार यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध श्रेणींच्या एकूण 57 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफचाही 15 हजार पदांवर समावेश आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 10 हजार पदांच्या भरतीला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच या पदांवर भरती सुरू होणार आहे.
पोलीस ड्रायव्हरसाठी टेस्ट शेड्यूल जारी
दुसरीकडे, उत्तर प्रदेश पोलीस किंवा उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने (यूपीपीआरपीबी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर उत्तर प्रदेश पोलीस ड्रायव्हर पदासाठी कौशल्य चाचणी वेळापत्रक जारी केले आहे. यूपीपीआरपीबी 12 सप्टेंबर 2022 पासून ड्रायव्हर पदासाठी कौशल्य चाचणी घेईल. जारी केलेल्या शॉर्ट नोटिसनुसार, ड्रायव्हर पोस्ट स्किल टेस्ट 12 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. यूपीपीआरपीबी उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी अॅडमिट कार्ड देईल. दरम्यान, उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तर प्रदेश पोलीस ड्रायव्हर स्किल टेस्ट शेड्यूल 2022 अपडेट डाउनलोड करू शकतात.