Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 01:19 PM2022-03-11T13:19:51+5:302022-03-11T13:26:57+5:30
Yogi Adityanath Oath Ceremony : यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election Result) भारतीय जनता पक्षाच्या (BJP)दणदणीत विजयानंतर आता सरकार स्थापनेची चर्चा रंगली असून योगी आदित्यनाथ होळीपूर्वी शपथ (Yogi Adityanath Oath Ceremony) घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. होळीपूर्वी शपथविधीबाबत पक्षप्रमुख विचारमंथन करत असून एकमत झाल्यानंतर तारीख जाहीर केली जाणार आहे.
यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. यातच असे सांगण्यात येत आहे की, होळीपूर्वी शपथविधी होऊ शकतो. कारण होळी 17 आणि 18 मार्चला आहे, तर 19 मार्च ही एमएलसी (MLC) नामांकनांसाठी शेवटची तारीख आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सहमती झाली तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 15 मार्च म्हणजेच मंगळवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा भव्यदिव्य होण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहू शकतात. तसेच, इतर अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते देखील शपथविधीला उपस्थित राहू शकतात. याशिवाय, भाजपशासित इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्यात उपस्थित राहू शकतात.
भाजपने जिंकल्या 255 जागा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election Result) निवडणूक आयोगाने रात्री उशिरा 403 जागांवर निवडणूक निकाल जाहीर केला, ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह 273 जागा जिंकल्या आणि पूर्ण बहुमत मिळवले. या निवडणुकीत भाजपने 255 जागा जिंकल्या, तर अपना दल 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. याचबरोबर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला 41.29 टक्के, तर समाजवादी पक्षाला 32.06 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते मिळाली आहेत.
योगी आदित्यनाथ जिंकले, केशव प्रसाद मौर्य पराभूत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर (Yogi Adityanath win from Gorakhpur Sadar) विधानसभेची जागा एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली. मात्र, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघात सात हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी पराभव केला. पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली.