UP Yogi Aditynath: 'बुलडोझर बाबा'ची भीती! कारवाईला घाबरुन समाजवादी पक्षाच्या नेत्याने तोडले स्वतःचे कोल्ड स्टोरेज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 03:16 PM2022-04-03T15:16:29+5:302022-04-03T15:26:22+5:30
UP Yogi Aditynath: योगी सरकार 2.0 मध्ये बाबाच्या बुलडोझरमुळे अतिक्रमण माफिया आणि गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. एटामधून एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात प्रशासनाच्या कारवाईला घाबरून सपा नेत्याने स्वतःचे कोल्ड स्टोरेज तोडले आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची दहशत पसरत आहे. योगी सरकारच्या काळात गुन्ह्यांमधील आरोपींच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर बुलडोझर चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. या कारवाईमुळे अनेकदा गुन्हेगार स्वतःहून सरेंडर करताना दिसत आहेत. कायदा मोडणाऱ्या प्रत्येकाला या बुलडोझरची भीती वाटत आहे. दरम्यान, याच बुलडोझरच्या भीतीमुळे समाजवादी पक्षाच्या (SP) नेत्याने स्वतःचे कोल्ड स्टोरेज पाडल्याची घटना घडली आहे.
राज्यात दुसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होताच जैत्रा येथील एका भट्टीभोवती शेकडो बिघा जमीन भूमाफियांनी बळकावून बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने लेखपाल यांच्या पथकासह दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून अतिक्रमण झालेल्या जमिनीचे मोजमाप करुन घेतले. त्यानंतर पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचून बुलडोझरच्या सहाय्याने अवैध बांधकाम पाडून उर्वरित जागा ताब्यातून मोकळी केली.
जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा
पोलीस प्रशासनाच्या या कारवाईला घाबरून सपा नेते रामनाथ सिंह यादव यांचा मुलगा विक्रांत यादव यांनी स्वत: जैथरा येथील कोल्ड स्टोरेज फोडले. रामनाथ सिंह यादव हे प्रोफेसर राम गोपाल सिंह यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात रामनाथसिंह यादव यांचा मोठा दबदबा आहे. रामनाथ सिंह यादव यांचे मोठे बंधू रामेश्वर सिंह यादव हे सपाचे माजी आमदार आहेत आणि त्यांची वहिनी सध्या जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत. रामनाथ यादव यांचे सैफई कुटुंबाशी जवळीक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास आतापर्यंत अधिकारी टाळाटाळ करत होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अनेक वर्षांपूर्वी 37 बिघा ग्रामपंचायतीची जमीन ताब्यात घेऊन भट्टी बांधण्यात आली असून, भट्टीच्या आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पाच महिने अगोदर जिल्हा प्रशासनाने जागा चिन्हांकित करून सपाचे नेते रामनाथ यादव यांना अवैध धंदे हटवण्याची नोटीस बजावली होती, मात्र नोटीसला उत्तर देताना सपाच्या नेत्याने महसूल परिषदेकडे दाद मागितली, जी महसूलने फेटाळून लावली. ही भट्टी पाडल्यानंतर बुलडोझरला घाबरलेल्या सपाच्या नेत्याने स्वतःहून मुलगा विक्रांत यादव यांच्या नावावर असलेल्या कोल्ड स्टोरेजमधील बेकायदा बांधकाम पाडले.