यूपीला दत्तक मुलाची गरज नाही, प्रियंका गांधींची मोदींवर टीका
By admin | Published: February 17, 2017 10:35 PM2017-02-17T22:35:58+5:302017-02-17T22:55:14+5:30
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची मुलुख मैदान तोफ धडाडली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची मुलुख मैदान तोफ धडाडली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रियंका गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मला उत्तर प्रदेशनं दत्तक घेतलं असल्याचं मोदी सांगत असले तरी विकासासाठी बाहेरच्या व्यक्तीला दत्तक घेण्याची उत्तर प्रदेशला गरज नसल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी आज रायबरेली येथे झालेल्या प्रचार सभेत मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. त्या म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक तरुणात नेता बनण्याची योग्यता आहे. नेता बनून राज्याचा विकास करण्याची धमक इथल्या तरुणांमध्ये आहे, असं प्रतिपादनही प्रियंका गांधींनी केलं आहे.
नोटाबंदीवरून प्रियंका गांधींनी मोदींवर शरसंधान केलं आहे. नोटाबंदीमुळे महिलांना जमवलेली पुंजी बाहेर फेकून द्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त पोकळ आश्वासनं देत असल्याचं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. विकास काय असतो ते पंतप्रधान मोदींनी अमेठीच्या जनतेला विचारावे, असंही त्या म्हणाल्या आहेत.