टू-जी निकालाने यूपीए आनंदात ; अस्वस्थता दूर करण्यास जेटलींचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:07 AM2017-12-22T02:07:12+5:302017-12-22T02:07:31+5:30
टू-जी स्पेक्ट्रम खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यास वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला.
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यास वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला.
गुरुवारी सकाळी हा निकाल लागताच भाजपाच्या नेत्यांच्या तोंडावर काहीशी अस्वस्थता निश्चितच दिसत होती. तब्बल १.७५ लाख कोटींच्या घोटाळ्यांत ज्यांच्यावर आपण आरोप केले, ते सारेच निर्दोष ठरल्याने ती अस्वस्थता होती. देशात २0१४ साली सत्तांतर होण्याची जी कारणे होती, त्यात टू-जी घोटाळा हेही प्रमुख होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारमधील ए. राजा यांच्यावरच तेव्हा भाजपाने ते आरोप केले होते. पण ही अस्वस्थता फार काळ राहू नये, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यासाठी झालेल्या बैठकीला जेटली यांच्याबरोबरच सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, मनोज सिन्हा, अमित शहा उपस्थित होते. त्या बैठकीनंतर लगेचच अरुण जेटली यांनी सरकारतर्फे प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसवर कडाडून टीका केली. या निकालाने काँग्रेसने हुरळून जायचे कारण नाही, न्यायालयाने टू-जी परवाने देताना अप्रामाणिकपणाचा अवलंब झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निर्दोष सुटकेमुळे अभिमान बाळगण्याचे कारण नाही, असे जेटली यांनी काँग्रेसला सुनावले.
भाजपा व केंद्र सरकार अस्वस्थ झाले नसले तरी द्रमुकचे नेते या निकालाचा फायदा घेऊन, तेव्हा काँग्रेसने आम्हाला वाºयावर कसे सोडले होते, हे सांगून काँग्रेसलाच अडचणीत आणू शकतील, असे भाजपाला वाटत आहे.
राजा यांना ‘क्लीन चिट’-
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या सर्व कथित घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राजा होते. त्यांनी टेलिकॉम परवाने देण्याची प्रचलित पद्धत सोडून मर्जीतील कंपन्यांना परवाने देण्यासाठी नवी पद्धत अनुसरली, हे करत असताना त्यांनी पंतप्रधानांचीही दिशाभूल केली आणि जो कोणी पैसे मोजायला तयार असेल त्याच्याशी सौदेबाजी करून परवाना देण्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी समांतर कार्यालय उघडले होते, असा सीबीआयचा आरोप होता. परंतु यापैकी एकाही आरोपात न्यायालयास अजिबात तथ्य आढळले नाही.
भाजपाचा खोटेपणा उघड; काँग्रेसची देशव्यापी मोहीम-
टू-जी घोटाळाप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसने भाजपा व केंद्र सरकारच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. याच प्रकरणात भाजपाने काँग्रेस व यूपीए सरकारला बदनाम केले होते. त्यामुळे भाजपाचा खोटेपणा व षड्यंत्र याविरोधात आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असे काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भाजपाच्या खोट्या प्रचारामुळेच अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांनी लोकपालाची मागणी केली. पण खटल्यात सारेच निर्दोष ठरले. त्यामुळे भाजपाचे आरोप खोटे ठरले. शिवाय अण्णांच्या मागणीला पाठिंबा देणारे नेते आज लोकपालाची नियुक्ती करायला तयार नाहीत, हे सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कॅगचे प्रमुख विनोद राय हेही याच षड्यंत्राचा भाग होते, असाही आरोप आनंद शर्मा यांनी केला.
काँग्रेसमध्ये आनंद, ही तर चपराकच-
भाजपा नेते काहीही म्हणत असले तरी या निकालामुळे काँग्रेसच्या हातात एक चांगलेच हत्यार मिळाले आहे. भाजपाने केलेले आरोप त्यांच्या सरकारच्या काळातच खोटे असल्याचे सिद्ध झाल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भ्रष्टाचाराचा ठपका या निकालामुळे पुसून निघाला आहे. या प्रकरणात घोटाळा, गुन्हेगारी स्वरूपाचा कट, कारस्थान असल्याचा एकही पुरावा आपल्याला दिसला नाही, असे न्यायालयाने म्हटल्याने भाजपा व केंद्र सरकारला ही चपराकच आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
आरोपपत्रातील त्रुटी केल्या उघड-
अॅड. विजय अगरवाल यांनी आर. के. चंदोलिया, शाहीद उस्मान बलवा, आसिफ बलवा अणि राजीव अगरवाल या पाच आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी सीबीआयच्या आरोपांना कोणत्याची पुराव्याचा आधार नसल्याचे न्यायालयास पटवून दिले. तसेच आरोपपत्रातील त्रुटी आणि पोकळपणाही उघड केला.
हे ठरले निर्दोष-
ए. राजा, सिद्धार्थ बेहुरा, आर. के. चांडोलिया, शाहीद उस्मान बलवा, विनोद गोएंका, मे. स्वान टेलिकॉम प्रा. लि., संजय चंद्रा, युनिटेक वायरलेस (तामिळनाडू) लि., गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा, हरी नायर, रिलायन्स टेलिकॉम लि., आसिफ बलवा, राजीव अगरवाल, करीम मोरानी, शरद कुमार, कनिमोळी करुणानिधी.
अधिका-यांनी केली दिशाभूल-
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजा यांनी टेलिकॉम परवाने कसे दिले जात आहेत याविषयी अंधारात ठेवले व त्यांची दिशाभूल केली, हा सीबीआयचा आरोपही न्यायालयाने धादांत बिनबुडाचा असल्याचे नमूद केले. राजा वेळोवेळी पंतप्रधानांना पत्र व टिपणाद्वारे माहिती देत होते. परंतु पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांनीच ती पूर्णांशाने डॉ. सिंग यांच्यापुढे न आणता त्यांना अंधारात ठेवले, असा ठपकाही न्यायालयाने ठेवला.