संपुआ सरकारने केदारनाथचे मंदिर बांधू दिले नाही, मोदींचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:41 AM2017-10-21T03:41:54+5:302017-10-21T03:42:17+5:30
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन संपुआ सरकारने मी केदारनाथच्या मंदिराची पुनर्बांधणी करू नये यासाठी दबाव आणला होता, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.
केदारनाथ(उत्तराखंड) : मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन संपुआ सरकारने मी केदारनाथच्या मंदिराची पुनर्बांधणी करू नये यासाठी दबाव आणला होता, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला. २०१३ च्या महाप्रलयात हजारो भाविक मृत्युमुखी पडले. केदारनाथचे मंदिर उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी मोदींनी या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मदत देऊ केली होती.
त्यांनी शुक्रवारी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या मंदिरात दर्शन घेतल्यामुळे देशसेवेचे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. हिमालय पर्वतराजीतील अतिउंचावरील या मंदिरात रुद्राभिषेक केल्यानंतर ते म्हणाले की, जनसेवा हीच ख-या अर्थाने ईश्वराची सेवा ठरते. केदारपुरी येथे त्यांनी पाच महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पाचा शिलान्यास केला. भाविकांना उत्तम सेवा.
मंदिरांच्या भिंती जतन करण्यासाठी तसेच मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांवरील घाटांचे बांधकाम. मंदिराला जाणारा रस्ता, आदिगुरू शंकराचार्य यांच्या समाधीची पुनर्बांधणी आदींचा त्यात समावेश आहे. २०१३ मधील महाप्रलयात या मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. हे प्रकल्प महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक असले तरी ते वेळेत पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
बाबांनी सोपविली जबाबदारी...
उत्तराखंड सरकारने मदत स्वीकारण्यास नकार दिल्याने मी निराश झालो होतो. बाबांनी (शिव) आज माझ्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. बाबांनी अन्य कुणावर नव्हे तर आपल्या पुत्रावर ही जबाबदारी सोपविली आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गुरूचट्टी येथे काढलेल्या दिवसांचे स्मरणही त्यांनी करवून दिले. ते माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण होते. याच भूमीवर बाबांच्या चरणी आयुष्य घालविण्याची माझी इच्छा होती,मात्र बाबांच्या मनात वेगळेच काही होते, असेही ते म्हणाले.