बँकांच्या कुकर्जास पूर्णत: संपुआ सरकार जबाबदार, पोस्ट बँकेच्या उद्घाटनात मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 06:02 AM2018-09-02T06:02:37+5:302018-09-02T06:03:06+5:30
आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.
नवी दिल्ली : आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ‘नामदारां’च्या वतीने देण्यात आलेल्या कर्जाची पै न पै वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात बँकांतील बहुतांश निधी केवळ ठरावीक कुटुंबांच्या जवळच्या श्रीमंतांसाठी राखीव ठेवला होता. स्वातंत्र्यापासून ते २00८ सालापर्यंत १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. त्यानंतरच्या सहा वर्षांत मात्र हा आकडा अचानक वाढून तब्बल ५२ लाख कोटींवर पोहोचला.
‘नामदारां’च्या नुसत्या फोनवर कर्जे देण्यात आली, असे मोदी कोणाचेही नाव न घेता म्हणाले. ते म्हणाले, नामदारांच्या शिफारशींवरून बँकांनी व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे नियम मोडून दिली. ही कर्जे परत येणार नाहीत, हे माहीत असूनही केवळ काही मोजक्या परिवारांनी आदेश दिला म्हणून बँकांनी कर्जे दिली. कर्जे थकली, तेव्हा बँकांना त्यांची पुनर्रचना करण्यास भाग पाडण्यात आले.
संपुआ सरकारने बँकांचा एनपीए लपविण्याचे काम केले. काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था स्फोटकांवर आणून ठेवली होती, असा टोलाही मोदींनी लगावला.