Monsoon Update: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:03 IST2021-10-06T14:57:01+5:302021-10-06T15:03:26+5:30
माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. मॉन्सून नेहमी ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. जवळपास २ महिने २४ दिवसांनंतर आता त्याने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे

Monsoon Update: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात
पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.
माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. मॉन्सून नेहमी ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. जवळपास २ महिने २४ दिवसांनंतर आता त्याने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार माॅन्सूनची परतीच्या सुरुवातीची तारीख १७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यंदा तो १९ दिवस उशीराने माघारी परतू लागला आहे.
बुधवारी पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जाेधपूर, जालाेर आणि भूजपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. पुढील ३ ते ४ दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजराजमध्ये पावसाने उघडीप दिली असून आर्द्रतेचे कमी झालेले प्रमाण व वार्याची दिशा ॲण्टी सायक्लोन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पश्चिम राजस्थानमधून मागील काही वर्षात परतीचा प्रवास सुरु केलेला दिवस
२८ सप्टेंबर २०२०
९ ऑक्टोंबर २०२९
२९ सप्टेंबर २०१८
२७ सप्टेंबर २०१७
१५ सप्टेंबर २०१६