भारावून टाकणारी नेतृत्वशैली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 03:18 AM2017-11-19T03:18:27+5:302017-11-19T07:19:56+5:30
इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणा-या निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.
- उल्हास पवार
(ज्येष्ठ कॉँग्रेस नेते)
इंदिराजी असामान्य नेत्या होत्या. देशातील अगदी वरच्या स्तरातील व्यक्तींपासून ते एखाद्या झोपडपट्टीत राहणाºया निराधार वृद्धेपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्धल त्यांना आंतरिक उमाळा होता. १० लाख रुपयांचा कोट घालून मिरवणाºयांना ते कधी कळणार नाही, समजणार नाही.
माझ्या कुमार अवस्थेपासून ते आतापर्यंत मला अनेक राजकीय नेते पाहायला मिळाले, त्यांच्याबरोबर वावरायला, काम करायलाही मिळाले. त्या सर्व नेत्यांमध्ये मी आजही इंदिरा गांधी यांना सर्वोच्च स्थान देतो. देशातील अगदी वरच्या स्तरातील वर्तुळापासून ते एखाद्या शहरातील अगदी कोपºयातल्या झोपडपट्टीतील राहणाºया गरीब निराधार वृद्ध महिलेपर्यंत सर्वांच्या मनात इंदिरा गांधी यांनी स्थान मिळवले होते. राजकारणात असे नेतृत्व अगदी दुर्मीळ असते. या प्रेमाबरोबरच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेषही निर्माण झाला, खरे तर केला गेला असेच म्हणावे लागेल. पण त्या अशा कर्तृत्वसंपन्न होत्या की त्यांनी द्वेषाचे रूपांतर प्रेमातच केले.
माझा-त्यांचा संपर्क आला तो मी प्रदेश युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर. त्यांनी व संजय गांधी यांनी दिलेला कार्यक्रम त्या वेळी आम्ही इतक्या हिरिरीने राबवला होता की देशात महाराष्ट्राचे नाव झाले होते. त्या वेळच्या युवकांमध्ये एक भारलेले वातावरण तयार झाले. अर्थात याला इंदिराजींचा करिश्माच कारण होता. पण सततचे कार्यक्रम व त्याची माहिती केंद्राला देणे यामुळे तेथे माझे नाव झाले. इंदिराजी मला नावाने ओळखू लागल्या. त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पक्षाच्या पदाधिकाºयांना त्या कशा सांभाळत याचा एक अत्यंत चांगला अनुभव माझ्याकडे आहे. मी युवक अध्यक्ष म्हणून त्या वेळच्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला नको होतो. ते मला कायम त्रास देत. त्यांचाही इंदिराजींशी चांगला संपर्क होता, ते महत्त्वाच्या पदावर होते. मी त्याबाबत कधीही संजय गांधी किंवा इंदिरा गांधी यांना सांगितले नव्हते. चांगले काम करत राहायचे इतकेच डोक्यात असायचे. इंदिराजींचा पुणे दौरा आला. मी त्या वेळी बरोबरच होतो, मात्र मला इंदिराजींजवळ जाऊ दिले जात नव्हते. जाताना त्या विमानाच्या शिडीच्या चार पायºया चढून गेल्या. अचानक इंदिराजी मागे वळल्या व वरूनच म्हणाल्या, पवारजी, काम अच्छा चल रहा है, चलने दो. बास!
कोणाचे चांगले काम सुरू आहे, याची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा त्यांच्याजवळ होती. ती विश्वासार्ह होती.
देशातील दलित, उपेक्षित, वंचित यांच्याबद्दल त्यांना आंतरिक उमाळा होता. हत्तीवरून, पायी प्रवास करीत देशाच्या एका कोपºयात पोहोचून पीडित दलित कुटुंबांच्या पाठीवर हात कोणता नेता ठेवेल? इंदिराजींमध्ये ती धमक होती.