यूपीत यादवी

By admin | Published: October 24, 2016 05:38 AM2016-10-24T05:38:49+5:302016-10-24T05:38:49+5:30

संपूर्ण देशाच्या राजकारणात महत्त्व असलेल्या उत्तर प्रदेशची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असतानाच, राज्यातील सत्ताधारी यादव घराण्यातच यादवी सुरू झाली आहे

UPput Yadavvi | यूपीत यादवी

यूपीत यादवी

Next

लखनौ : संपूर्ण देशाच्या राजकारणात महत्त्व असलेल्या उत्तर प्रदेशची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असतानाच, राज्यातील सत्ताधारी यादव घराण्यातच यादवी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चार मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर, रामगोपाल यादव यांचे झालेले निलंबन यामुळे समाजवादी पार्टीत उभी फूट पडण्याची चिन्हे आहेत. आता पक्षाध्यक्ष मुलायमसिंह यादव काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांनी सुरू केलेल्या पत्रनाट्यानंतर दिवसभरात अनेक घटनांनी यूपीतील यादवी चर्चेत राहिली. प्रदेशाध्यक्ष पदाची माळ नुकतीच गळ्यात पडलेले शिवपाल यादव यांच्यासह पाच मंत्र्यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्यानंतर, लगोलग शिवपाल यांनी रामगोपाल यांना पक्षातून निलंबित करून टाकले.
शिवपाल यांनी तीनपानी पत्र प्रसार माध्यमांमध्ये जारी करून त्यात रामगोपाल यांच्यावर भाजपाशी हातमिळवणीचा आरोपही केला. रामगोपल, त्यांचे खासदार पुत्र अक्षय आणि त्यांची सून हे नोयडा येथील घोटाळ्यात अडकण्याच्या भीतीने भाजपाशी हात मिळवून, सपाला कमकुवत करण्याचा कट करत आहेत. शिवाय अक्षय आणि त्यांच्या पत्नीची सीबीआयच्या चौकशीतून सूटका करून घेण्यासाठी, ते भाजपाच्या एका बड्या नेत्याला तीन वेळा भेटले आहेत. या साऱ्यांमुळे सपातील यादवी चव्हाट्यावर आली आहे.

दिवसभरातले महाभारत
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव रामगोपाल यादव यांनी सकाळी सहा वाजता आमदारांच्या नावे पत्र लिहिले. त्यात आमदारांना उघडपणे धमकावण्यात आले.

अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला. अमरसिंग यांच्यावर हल्लाबोल केला. अमरसिंग यांच्यासोबत असणाऱ्यांना पक्षात आणि मंत्रिमंडळात स्थान नसेल, असेही स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष शिवपाल
यादव यांनी अखिलेश यांच्या पाठिशी असणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून निलंबित केले. शिवाय त्यांच्यावर भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला.

रामगोपाल यादव यांनी
पुन्हा शिवपाल यांच्यावर निशाणा साधला. नेताजींना राक्षसी वृत्तीच्या लोकांनी घेरल्याचा आरोप त्यांनी केला.

आजच्या बैठकीवर नजर
मुलायमसिंह यांनी सोमवारी आमदार, मंत्री, विधानपरिषद सदस्य यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीवर साऱ्यांची नजर आहे. या बैठकीत अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

हकालपट्टी
झालेले मंत्री
1. शिवपाल यादव
2. ओमप्रकाश सिंह
3. नारद राय
4. सय्यदा
शादाब फातिमा

या मंत्र्यांच्या बरखास्तीला राजभवनाने मंजुरी दिल्यानंतर, मुख्य सचिवांनी याबाबतचे आदेश जारी
केले आहेत, तर कॅबिनेटचा दर्जा असलेल्या यूपी फिल्म विकास परिषदेच्या उपाध्यक्षा जयाप्रदा यांनाही हटविण्यात आले आहे.

Web Title: UPput Yadavvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.