समान नागरी कायद्याच्या खासगी विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:33 AM2022-12-10T06:33:47+5:302022-12-10T06:34:29+5:30
डीएमकेसह टीएमसी, काँग्रेस, सपाचे सदस्य आक्रमक
नवी दिल्ली : भाजपचे खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी समान नागरी संहिता विधेयक २०२० हे खासगी सदस्य विधेयक आज राज्यसभेत मांडल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. या खासगी विधेयकामुळे देश बरबाद होईल, असा आरोप विरोधकांनी केला.
शुक्रवारी सदस्यांना खासगी विधेयक मांडण्याची संधी मिळते. यानुसार आज भाजपचे डॉ. किरोडीलाल मीणा यांनी भारतात समान नागरी संहिता विधेयक, २०२० या नावाचे खासगी विधेयक मांडले.
सभापतींनी हे विधेयक मांडण्याची परवानगी दिल्याबरोबर डीएमकेचे तिरुची सिवा यांनी आक्षेप घेतला. सिवा यांच्यासह टीएमसीचे डेरेक ओब्रायन यांनीही या विधेयकाला विरोध केला. त्यांनी यावर बोलण्याची संधी मागितली. विधयेक मांडल्यानंतर आपल्याला बोलण्याची संधी मिळेल, असे सभापतींनी सांगितले. त्यानंतर डॉ. मीणा यांनी विधेयक मांडले. परंतु यावर ते काहीच बोलले नाही.
विधेयकावर चर्चा झालीच नाही
हे विधेयक मांडण्याला एमडीएमकेचे वायको यांनी विरोध दर्शविला. नियम ६७ नुसार आपण नोटीस दिली असून हे विधयेक मांडता येणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी भाजपचे प्रकाश जावडेकर यांनीही एखाद्यावर मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यावर वायको यांनी देशभक्तीचा ठेका काही लोकांनाच दिलेला नाही, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. या विधेयकांवर चर्चा झालीच नाही.
सर्व पक्षांनी सामूहिक प्रयत्न करावे : गडकरी
समान नागरी कायद्याबद्दल सर्व पक्षांनी सम्यक चर्चा करण्याची आवश्यकता आहे. एका व्यक्तीने चार लग्न करणे हे अनैसर्गिक आहे. सर्व धर्मांना समानतेचा अधिकार आहे. यासंदर्भात सरकार एक समिती स्थापन करणार आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
विरोधकांची हौदापर्यंत धाव
सिवा यांना टीएमसी, काँग्रेस, सपा व इतर विरोधी सदस्यांनी समर्थन दिले व विरोधी पक्षाचे सदस्य हौदात आले. सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांना जागेवर जाण्याची वारंवार विनंती केली. परंतु सदस्य हौदातून जागेवर गेले नाही. हे विधेयक मताला आल्यानंतर आपण यावर आक्षेप नोंदवा परंतु विधयेक मांडण्याला विरोध करणे योग्य नसल्याचे सांगून सभापती धनखड यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.