नवीन संसदेतील ड्रेसकोडवरून गदारोळ, कर्मचारी नवीन गणवेशाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 08:10 IST2023-09-15T08:10:02+5:302023-09-15T08:10:14+5:30
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला असून, यावरून गदारोळ उठला आहे. संसदेच्या काही कर्मचाऱ्यांना गणवेशाचे आठ तर राज्यसभेच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसाबसा एकच गणवेश मिळाला आहे.

नवीन संसदेतील ड्रेसकोडवरून गदारोळ, कर्मचारी नवीन गणवेशाच्या प्रतीक्षेत
- संजय शर्मा
नवी दिल्ली - नवीन संसदेतसंसद कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला असून, यावरून गदारोळ उठला आहे. संसदेच्या काही कर्मचाऱ्यांना गणवेशाचे आठ तर राज्यसभेच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसाबसा एकच गणवेश मिळाला आहे. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गणवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवीन संसद भवनात नवीन ड्रेसकोड व संसद कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशासह प्रवेश करायचा आहे. परंतु आतापर्यंत सर्वांना ते मिळू शकलेले नाहीत. नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी अनेक बदल करण्यात आले आहेत. यात संसदेतील कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन संसद भवनाचे नियम व प्रोटोकॉलही वेगळे तयार करण्यात आले आहेत. तीन दिवसांनी संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. परंतु आतापर्यंत अनेक संसद कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी नवीन गणवेशाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.
विरोधक संसदेत मुद्दा उपस्थित करणार
संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचे फूल व खाकी पँट देण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांना मोठा मुद्दा मिळाला आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकारला इतर कोणते डिझाईन मिळाले नाही का?