ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:25 AM2024-06-17T05:25:15+5:302024-06-17T05:25:52+5:30
मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकाल लागून दोन आठवडे झाल्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) वापरण्यावरून पुन्हा गदारोळ सुरू झाला आहे. प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अनेक कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी हॅकिंगच्या संभाव्य असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना, निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) न वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी आक्षेप दर्शवत, या आराेपामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे; तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) एकप्रकारचे ‘ब्लॅक बॉक्स’ आहे, ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाच नाही, असा टोला लगावला आहे.
जगभरातील ईव्हीएमच्या सुरक्षेवर वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, विशेषत: पोर्तो रिकोच्या अलीकडील प्राथमिक निवडणुकांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपांनंतर त्यांची ही टिप्पणी आली आहे. या संदर्भात आपल्याच मालकीच्या सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये मस्क म्हणाले, ‘आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत. मानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हॅक होण्याचा धोका कमी असला तरी त्याचा परिणाम खूप जास्त हाेताे.’ पोर्तो रिकोमध्ये अलीकडच्या वादांमुळे ईव्हीएम सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तेथील प्राथमिक निवडणुका ईव्हीएमशी संबंधित अनेक गैरप्रकारांनी गाजल्या होत्या. मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.
पारदर्शकतेबद्दल चिंता
भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल जगभरात सध्या गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये जबाबदारी नसते, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि हेराफेरीची शक्यता वाढते, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
भाजपने खुलासा करावा
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी पुन्हा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञान’ समस्यांचे कारण बनल्यास त्याचा वापर बंद केला पाहिजे.
ईव्हीएम हॅक करण्याचा कोणताही मार्ग नाही
- एक्सवर मस्क यांना उत्तर देताना राजीव म्हणाले की, ‘कोणीच सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही,’ असे इलॉन मस्क यांना म्हणायचे आहे; पण ते अमेरिका आणि इतर देशांबद्दल बोलत असावेत; कारण तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेली मतदान यंत्रे बनवतात; पण भारतात बनविलेली ईव्हीएम अत्यंत वेगळ्या प्रकारे बनवलेली आहे.
- या ईव्हीएममध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ नाही, वायफाय नाही, इंटरनेट नाही; त्यात कोणताही मार्ग नाही, ज्याने ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात. यासाठी कंपन्यांमध्ये तयार केलेल्या कंट्रोलर्समध्ये पुन्हा प्रोग्रामिंग करता येत नाही. इलॉन यांना याबद्दल माहिती देण्यास आम्ही उत्सुक आहोत.