भारत-चीन संघर्षावरून गदारोळ; संसदेत चर्चेची मागणी अमान्य, विरोधकांकडून सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:47 AM2022-12-15T06:47:25+5:302022-12-15T06:47:45+5:30
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनच्या आक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत गत काही दिवसांत झालेल्या झटापटीचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी पुन्हा उपस्थित झाला. यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी दोन्ही सभागृहांतून सभात्याग केला.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनच्या आक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आम्ही कालही या मुद्द्यावर नोटीस दिली होती. सभागृहाला अनेक बाबी समजून घ्यायच्या आहेत.
खरगे यांना रोखले
उपसभापती हरिवंश यांनी खरगे यांना रोखले आणि सांगितले की, आज या विषयावर नोटीस नाही. त्यामुळे यावर चर्चा होऊ शकत नाही. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी यावर माहिती दिली आहे. याचवेळी विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.
१९६२ युद्धावेळीही संसदेत झाली चर्चा
लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी भारत आणि चीन यांच्या सैनिकांतील झटापटीबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, १९६२ मध्ये युद्धाच्यावेळी संसदेत चर्चा झाली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १६५ सदस्यांना बोलण्याची संधी दिली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की, या विषयावर बीएसीच्या बैठकीत निर्णय होईल. सरकार तवांगच्या मुद्द्यावर चर्चा होऊ देत नाही, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.