विनेशवरून गदारोळ, विरोधकांचा सभात्याग; नाराज सभापती धनखड यांनी सोडले सभागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:56 AM2024-08-09T06:56:36+5:302024-08-09T06:57:27+5:30
सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फोगाट अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु धनखड यांनी त्यास परवानगी दिली नाही.
नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांमधील कटू संबंध गुरुवारी पुन्हा एकदा समोर आले. पॅरिस ऑलिम्पिकमधून कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रतेवर चर्चा करण्याला धनखड यांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांची तृणमूल काँग्रेसचे नेते आणि काही इतर विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला, तर नाराज धनखड यांनीही सभागृह सोडले.
सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फोगाट अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु धनखड यांनी त्यास परवानगी दिली नाही. यानंतर सभापती आणि डेरेक ओब्रायन यांच्यात खडाजंगी झाली. डेरेक ओब्रायन आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले, परंतु सभागृहात गदारोळामुळे त्यांचे म्हणणे कोणाला ऐकू येत नव्हते. यावर धनखड यांनी “तुम्ही सभापतींवर ओरडत आहात. तुमची वर्तणूक सभागृहात सर्वात खराब आहे. मी तुमच्या कृतीचा निषेध करतो. पुढच्या वेळी मी तुम्हाला दरवाजा दाखवीन.”
सभापतींना ज्या पद्धतीने आव्हान दिले जात आहे ते मी पाहत आहे. हे आव्हान मला दिले जात नाही, तर सभापतिपदाला दिले जात आहे. या पदावर असणारी व्यक्ती पदाच्या लायकीची नाही, असे वाटल्याने हे आव्हान दिले जात आहे. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. मी आता या आसनावर बसण्याच्या स्थितीत नाही. मी दुःखी मनाने...’’ असे म्हणत धनखड आसन सोडून निघून गेले.
सर्व मंत्री गडकरींसारखे झाले तर देशाचा उद्धार
nतृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांनी गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे लोकसभेत कौतुक केले. सरकारचे सर्व मंत्री त्यांच्यासारखे झाले तर देशाचा उद्गार होईल, असे ते म्हणाले.
nफक्त मीच नाही तर संपूर्ण सभागृह त्यांच्या (गडकरी) कार्यपद्धतीचे चाहते आहोत. इतर मंत्रीही असे झाले तरच देशाचा उद्धार होईल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक सदस्यांनी बाकडे वाजवून पाठिंबा दर्शवला.
‘त्यांनाही’ पोस्टल मतदानाची सुविधा द्या
आपले गाव सोडून कामानिमित्त जाणारे किंवा अभ्यास करणारे तरुण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ऑनलाइन किंवा पोस्टल मतदान करण्यास पात्र ठरवावेत, अशी मागणी भाजप खासदार गणेश सिंह यांनी केली.
कांद्यांची माळ घालून विरोधी खासदार संसदेत
'इंडिया'च्या विविध घटक पक्षांचे अनेक सदस्य गुरुवारी कांद्यांच्या माळा घालून संसदेत पोहोचले आणि त्यांनी पिकांना योग्य किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करण्याची मागणी केली. महाराष्ट्राने शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, ती रद्द करावी, असे खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.