जाती, प्रदेशाच्या नावावर देशाचे विभाजन करणाऱ्या शक्तींना उखडून टाका: पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 07:32 AM2023-10-25T07:32:16+5:302023-10-25T07:35:47+5:30
दसरा कार्यक्रमात केले आवाहन.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जातीवाद आणि प्रादेशिकतेने देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना संपवा, दसऱ्यानिमित्त भारताच्या विकासाची नव्हे, तर स्वार्थी हितसंबंधांची चिंता करणाऱ्या विचारधारा जाळल्या पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.
दिल्ली येथे दसरा कार्यक्रमात ते म्हणाले की, हा सण रावणाच्या पुतळ्याचे दहन आणि प्रभू रामाचा राक्षसांवर विजय मिळविण्यापुरता मर्यादित नसावा, तर देशातील प्रत्येक वाईटावर देशभक्तीचा विजय म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. सामाजिक कुप्रथा आणि भेदभाव संपविण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या प्रत्येक वाईटाचेही दहन केले पाहिजे.
भगवान श्रीराम बसने ही वाले हैं...
१० दिवसांच्या दुर्गापूजा उत्सवासह रामलीलाच्या समारोपप्रसंगी मोदींनी नमूद केले की, अयोध्येत प्रभू रामाला समर्पित भव्य मंदिर बांधले जात आहे. शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपण त्याचे साक्षीदार आहोत, हे प्रत्येकाचे भाग्य आहे. मंदिर काही महिन्यांत पूर्ण होईल आणि लोकांच्या संयमाचा हा विजय आहे. भगवान श्री राम बसने ही वाले हैं (भगवान रामाचे आगमन जवळ आले आहे).