खंडणी, अपहरण प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशच्या आमदारास मध्यप्रदेशात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:27 AM2020-08-15T01:27:35+5:302020-08-15T01:27:42+5:30

पत्नी, मुलाविरुद्धही गुन्हा; दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी स्थापन केले पथक

up's Bahubali Mla Vijay Mishra Arrested From Aagar Madhya Pradesh | खंडणी, अपहरण प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशच्या आमदारास मध्यप्रदेशात पकडले

खंडणी, अपहरण प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशच्या आमदारास मध्यप्रदेशात पकडले

Next

आगर माळवा (मध्यप्रदेश)/भादोही (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील एका आमदारास मध्यप्रदेशात पकडण्यात आले आहे. त्याच्यावर अपहरण आणि खंडणीचे आरोप आहेत.

विजय मिश्रा, असे या आमदाराचे नाव असून, तो निषाद पार्टीचा ग्यानपूर भादोही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार मध्यप्रदेश पोलिसांकडून त्यास आगर माळवामधील तानोदिया चौकीजवळ ताब्यात घेण्यात आले.

आगर माळवाचे एसपी राकेश सागर यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला उत्तर प्रदेशातील भादोही पोलिसांनी आमदार मिश्रा याला पकडण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार आम्ही ही कारवाई केली आहे. तो उज्जैनमार्गे राजस्थानातील कोटा येथे चालला होता. त्याला पकडल्याची माहिती भादोही पोलिसांना देण्यात आली आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात सागर यांनी सांगितले की, मिश्रा यास आम्ही पकडले आहे. अटक केलेले नाही. आम्ही त्याला भादोही पोलिसांच्या ताब्यात देऊ. पुढील कारवाई भादोही पोलीस करतील.

दरम्यान, भादोहीचे एसपी राम बदन यांनी सांगितले की, मिश्रा हा उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनाला जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार, त्याला पकडण्याची विनंती आम्ही आगर माळवाच्या एसपींना केली होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी आमचे एक पोलीस पथक मध्यप्रदेशला रवानाही झाले आहे. राम बदन यांनी सांगितले की, आमदार विजय मिश्रा, त्याची पत्नी रामलाली आणि मुलगा विष्णू मिश्रा यांच्याविरुद्ध ४ आॅगस्ट रोजी त्यांचाच एक नातेवाईक कृष्णमोहन तिवारी याने मालमत्ता हडप करणे, तसेच धमकी देण्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि. ३२३, ३४७, ३८७, ४४९ आणि ५0६ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तत्पूर्वी, मिश्रा याने एक व्हिडिओ जारी करून ‘आपण ब्राह्मण असून विरोधकांनी आपल्याला फसविण्याचा कट केल्या’चा आरोप केला.

मुलासाच्या अटकेस अंतरिम स्थगिती
पोलिसांनी सांगितले की, मिश्रा याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत ७३ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला गुंडा अ‍ॅक्ट आणि रासुकासारख्या कडक कायद्यान्वये अटकही झालेली आहे.
भादोहीच्या एसपींनी सांगितले की, मिश्रा याची पत्नी आणि मुलगा यांना अटक करण्यासाठी एक पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.
मिश्रा याची पत्नी रामलाली मिश्रा ही उत्तर प्रदेश विधान परिषदेची समाजवादी पार्टीची आमदार आहे. तिने जामिनासाठी भादोहीच्या जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी.एन. श्रीवास्तव यांनी तो फेटाळून लावला, तसेच तिला एमपी/एमएलए न्यायालयात जाण्यास सांगितले.

मिश्रा याची मुलगी रिमा मिश्रा हिने अंतरिम जामिनासाठी आपली आई आणि भावाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.
सरकारी वकील दिनेश पांडे यांनी सांगितले की, अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत विष्णू मिश्रा यास अटक करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी २0 आॅगस्ट रोजी होणार आहे.

Web Title: up's Bahubali Mla Vijay Mishra Arrested From Aagar Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.