आईला दिलेले IAS होण्याचे वचन, पण..; विजेचा धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 07:29 PM2024-07-24T19:29:17+5:302024-07-24T19:30:20+5:30

निलेशने UPSC-2024 ची प्रीलिम्स पास करुन मेन्सची तयारी सुरू केली, पण नियतीने घात केला.

upsc aspirant died due to electric shock in patel nagar delhi | आईला दिलेले IAS होण्याचे वचन, पण..; विजेचा धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

आईला दिलेले IAS होण्याचे वचन, पण..; विजेचा धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली : देशातील लाखो तरुण UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. य परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेकजण राजधानी दिल्लीची वाट धरतात. पण, याच दिल्लीला येणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या निलेश राय नावाच्या तरुणाला हाकनाक आपला जीव गमवावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राय उत्तर प्रदेशातील गाझीपूरचा रहिवासी होता. IAS अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला निलेश युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला आला. घटनेच्या दिवशी दिल्लीत खुप पाऊस पडला होता. पटेल नगरमध्ये राहणारा नितीन सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला. घरी आल्यावर त्याने आत जाण्यासाठी लोखंडी गेटला हात लावला अन् त्याला विजेचा तीव्र झटका बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच निलशचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत आले आणि त्याचा मृतदेह गाझीपूरला आणल्यानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून निलेशच्या आईने एकच टाहो फोडला. IAS होण्याचे वचन दिलेला निलेश असा परत येईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. निलेशचे वडील नरेंद्र नाथ राय व्यवसायाने वकील आहेत. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि यासाठी दिल्ली सरकार जबाबदार धरले आहे.

वीज विभाग दिल्ली सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे दिल्ली सरकारच यासाठी जबाबदार आहे. योग्य व्यवस्था असती, तर आज माझा मुलगा जिवंत असता, असे ते म्हणाले. तसेच, या घटनेनंतर प्रशासन किंवा दिल्ली सरकारने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. तिथे शिकणाऱ्या इतर मुलांनी निलेशसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. आता याप्रकरणी भाजपदेखील आप सरकारवर हल्लाबोल करत आहे.
 

Web Title: upsc aspirant died due to electric shock in patel nagar delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.