IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया UPSC मध्ये टॉपर, कुटुंबीयांसह प्रेयसीला दिलं यशाचं श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:19 PM2019-04-07T12:19:03+5:302019-04-07T12:30:27+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. कनिष्क हा आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे.

upsc civil services result 2018 topper kanishka kataria exclusive interview with lokmat | IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया UPSC मध्ये टॉपर, कुटुंबीयांसह प्रेयसीला दिलं यशाचं श्रेय

IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया UPSC मध्ये टॉपर, कुटुंबीयांसह प्रेयसीला दिलं यशाचं श्रेय

Next
ठळक मुद्देकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आलादक्षिण कोरियात काही वर्ष नोकरी केल्यानंतर तो भारतात परतला आणि यूपीएससीमध्ये टॉप केलं आहे. कनिष्कने आपल्या यशाचं श्रेय हे आई-वडीलांसोबतच आपल्या प्रेयसीला देखील दिलं.

आदित्य द्विवेदी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. कनिष्क हा आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे. राजस्थानच्या कनिष्कने आयआयटी मुंबईमधून बी टेक केलं आहे. दक्षिण कोरियात काही वर्ष नोकरी केल्यानंतर तो भारतात परतला आणि यूपीएससीमध्ये टॉप केलं आहे. कनिष्कने आपल्या यशाचं श्रेय हे आई-वडीलांसोबतच आपल्या प्रेयसीला देखील दिलं आहे. लोकमत न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कनिष्कने त्याचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात त्याने अव्वल यश मिळवल्याचं सांगितलं आहे. 

हा तुझा कितवा प्रयत्न होता?

- पहिलाच प्रयत्न होता. याआधी मी एकदा 2014 मध्ये परीक्षा दिली होती मात्र त्यावेळी मी ती गांभीर्याने घेतली नव्हती. माझ्या वडिलांनी परिक्षेसाठी फॉर्म भरला होता पण त्यावेळी मी यूपीएससी करेन असा विचार ही केला नव्हता. 

तुझं शिक्षण कुठे झालं? यूपीएससीमध्ये पर्यायी विषय काय होता?

- माझं शिक्षण कोटा येथे झालं आहे. मी आयआयटी मुंबईमधून बी टेक केलं.  त्यानंतर दक्षिण कोरियात काही वर्ष नोकरी केली. यूपीएससीमध्ये पर्यायी विषयांमध्ये गणित हा विषय घेतला होता. 

यूपीएससीसाठी तयारी करण्याचा निर्णय केव्हा घेतला?

- 2017 मध्ये मी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात आलो.  दक्षिण कोरियात काम केलं होतं. तिथलं प्रशासन पाहून आपल्या देशातही प्रशासकीय सेवेत काम करावं असं मला वाटू लागलं. घरात वडिलांकडूनही योग्य मार्गदर्शन मिळाले. 

परिक्षेची तयारी करताना तुझा दिनक्रम कसा होता? 

- माझा दिनक्रम खूप सिस्टमॅटीक होता. रोज 10-12 तास अभ्यास करत असे. दिल्लीत कोचिंग घेत अभ्यासक्रमाची माहिती करुन घेतली. तसेच कोचिंग क्लास आणि सेल्फ स्टडी मॅनेज केलं. पूर्ण एकाग्रतेने जेवढा अभ्यास केला जातो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. 

परिक्षेची तयारी करताना पुस्तकांवर अवलंबून होतास की इंटरनेट?  

- पुस्तकांमधून बेसिक तयारी केली. गणितासाठी काही नोट्सचा आधार घेतला. तसेच करंट अफेअर्ससाठी मी इंटरनेटचा वापर केला. काही वेळ मी सोशल मीडियापासून लांब होतो. मात्र मित्र काय करतात हे पाहण्यासाठी कधी कधी त्याचा वापर केला.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश देशील?

- आत्मविश्वास आणि मेहनतीचा जोरावर परिक्षेत यश संपादन करू शकता. या परिक्षेचा जास्त ताण घेऊ नका. एखाद्या साध्या परिक्षेप्रमाणे या परिक्षेला देखील सामोरे जा. अभ्यासाचं तसेच परिक्षेचं दडपण घेऊ नका यश हमखास मिळेल. 

यूपीएससीच्या परिक्षेची तयारी कशी केली?

- यूपीएससीच्या परिक्षेची तयारी घरीच केली. एक्पोजरसाठी 2-3 ठिकाणी मॉक इंटरव्यू दिले. बाबा आणि काही वरिष्ठांकडून टिप्स घेतल्या. तसेच अनेक वर्तमानपत्रं वाचली. राज्यसभा टीव्हीवरील डीबेट ऐकले. तसेच अभ्यास करताना अनेक नोट्स काढल्या. माझा इंटरव्यू याच सर्व गोष्टींवर आधारित असल्याने मी भाग्यशाली होतो. 

परिक्षेत टॉप करशील याची आशा होती का? 

- मी पहिल्यांदाच यूपीएससीचा इंटरव्यू दिला होता त्यामुळे मार्क्स कसे असणार याचा अंदाज नव्हता. व्हॅल्यू अ‍ॅडेड मार्किंग असतं. ऑप्शनल चांगलं असल्याने क्लिअर होणार हे माहीत होतं. मात्र टॉपर असेन असा विचार केला नव्हता. 

तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील?

- खूप लोकं आहेत ज्यांना धन्यवाद बोलायचे आहे. मला माझ्या आई-बाबा आणि बहिणीने खूप मदत केली. मला अभ्यास करता यावा यासाठी आईने नेहमीच घरात चांगलं वातावरण ठेवलं. माझ्या अनेक मित्रांनी ही माझी मदत केली. माझ्या प्रेयसीने मोरल आणि इमोशनल सपोर्ट केला आहे. 

प्रेयसीशी कशी भेट झाली? 

- मी माझ्या प्रेयसीसोबत 8-9 वर्षांपासून आहे. कॉलेजपासून आम्ही दोघं एकत्र आहोत. त्यामुळेच इतक्या वर्षात एक इमोशनल कनेक्ट झालं आहे. जेव्हा मी निराश होतो तेव्हा ती मला प्रेरणा देते. तू करू शकतोस हे ती नेहमी सांगते. तसेच आई-वडील ही खूप सपोर्ट करतात. 

यूपीएससीमध्ये टॉप केल्यावर सर्वांची रिअ‍ॅक्शन काय होती?

- मी परिक्षेत टॉप करेन असं कोणाला वाटलं नव्हतं. पण जेव्हा निकाल आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी टॉप 50 किंवा 100 चा विचार केला होता पण टॉपर असेन असं वाटलं नव्हतं. पण आयएएस क्लिअर होणार यावर विश्वास होता. 

UPSCच्या निकालात महाराष्ट्रातील सृष्टी देशमुख पाचवी, कनिष्क कटारिया देशात अव्वल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे. तर तृप्ती धोडमिसे ही 16वी, वैभव गौंदवे हा 25वा आला आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे. पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे.तर पुण्याच्या तृप्ती दोडमिसे या देशात 16व्या आल्या आहेत. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला, तर महिलांमधून सृष्टी देशमुख ही पहिली आली आहे. 

 

Web Title: upsc civil services result 2018 topper kanishka kataria exclusive interview with lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.