जिद्दीला सलाम! ८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 07:06 PM2023-05-23T19:06:05+5:302023-05-23T19:06:42+5:30
garima lohia upsc : गरिमा लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली.
UPSC Topper Garima Lohia : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील मुलींनी बाजी मारली असून पहिल्या चारमध्ये तरूणींचा समावेश आहे. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर बिहारची गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. लक्षणीय बाब म्हणजे लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली.
८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं
गरिमा लोहिया ही बिहारमधील बक्सर येथील रहिवासी आहे. तिथे येथीलच शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. वडील नारायण प्रसाद लोहिया यांचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले अन् गरिमाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरिमाने कोरोना लॉकडाऊन दरम्यान UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि मेहनतीने तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले पण दुसऱ्या प्रयत्नात तिने देशात दुसरा क्रमांक पटकावला.
घरीच केली 'यशस्वी' तयारी
गरिमाने कोणताही शिकाऊ क्लास न लावता घरीच परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तिने म्हटले, "तयारीसाठी मोठ्या शहरात जाऊन महागडे कोचिंग करण्याची गरज नाही. जिथे बसून अभ्यास करणे सोयीचे वाटेल तिथेच अभ्यास करा. मी घरीच राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. कारण जेव्हा माझा आत्मविश्वास ढासळायचा तेव्हा कुटुंबाचा पाठिंबा मला खूप धीर द्यायचा." असं ती एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होती.
एका लहानश्या शहरात राहून मोठे स्वप्न पाहणे आणि ते आज सत्यात उतरले हे पाहून खरंच खूप आनंद होत असल्याचे गरिमाने सांगितले. मी कोणतेही वेळापत्रक बनवले नव्हते तशी तयारीही केली नाही. काही दिवस ८-९ तास तर कधी २-३ तास अभ्यास केला. तुम्ही तुमची स्वतःची रणनीती बनवणे महत्त्वाचे आहे, असंही तिने यावेळी सांगितले.