पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:41 PM2024-09-08T19:41:30+5:302024-09-08T19:42:03+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
UPSC News : काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, आता अशाप्रकारची आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. कारण, पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आयोग लवकरच अशा अधिकाऱ्यांची चौकशी करू शकते. मात्र, यासंदर्भात आयोगाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
UPSC नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस इत्यादी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. देशाच्या विकासकामांची आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळेच सरकारी विभागातील वरिष्ठ पदांवर हेराफेरी किंवा अन्य मार्गाने निवड होणे खरोखरच चिंताजनक आहे.
30 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकर वादानंतर यूपीएससीकडे कागदपत्रांमध्ये छेडछाड करुन नोकरी मिळवलेल्या 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रात आणि इतर तपशीलांमध्ये चुकीची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. UPSC ने या तक्रारी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे (DoPT) पाठवल्या असून, तपास सुरू केला आहे.
नवीन प्रणाली तयार होणार
दुसरीकडे, उमेदवारांकडून अपंगत्वाच्या निकषांचा आणि कोट्याचा गैरवापर टाळण्यासाठी सरकार सक्रियपणे चर्चा करत आहे. या विषयावर अनेक बैठका घेतल्या जात आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि LBSNAA दोन्ही या उणीवा दूर करण्यासाठी आणि गंभीर समस्या ओळखण्यासाठी प्रोटोकॉल तयार करत आहेत. नाव बदलण्याची फसवणूक टाळण्यासाठी UPSC ने आपले सॉफ्टवेअर आणि प्रोटोकॉल अपडेट केले आहेत. नवीन प्रणालीमुळे आता उमेदवाराची संपूर्ण माहिती जाणून घेण्यात मोठी मदत होईल.
केंद्राने पूजा खेडकरला तातडीने हटवले
केंद्र सरकारने बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ कार्यमुक्त केले आहे. सरकारने ओबीसी कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 31 जुलै रोजी पूजाची उमेदवारी रद्द केली होती. तसेच, तिला भविष्यातील परीक्षांमधूनही वगळण्यात आले आहे.