UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:39 PM2023-05-23T18:39:21+5:302023-05-23T18:40:35+5:30
Jammu Kashmir Topper UPSC Result 2022: यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
यंदाचा यूपीएससीचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या चारमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोर यंदाच्या UPSC परीक्षेत UPSC 2022 ची टॉपर ठरली आहे. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींनी अव्वल स्थान मिळवले आहे. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे. 933 उमेदवार नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी वसीम अहमद भट याने सातवा क्रमांक पटकावला आहे. तर पूंछ जिल्ह्यातील प्रसनजीत कौर हिने परीक्षेत 11 वा क्रमांक पटकावला आहे. वसीम अहमद भटने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 225 वी एआयआर मिळवली होती. तो सध्या मुंबईत आहे. वसीम अहमदचा हा तिसरा प्रयत्न होता. त्याने श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.
24 वर्षीय वसीमला एंथ्रोपोलॉजीची पुस्तके वाचण्याची आणि साय-फाय टीव्ही शो पाहण्याची आवड आहे. एंथ्रोपोलॉजी हा त्याचा ऐच्छिक विषय होता. वसीमच्या या कामगिरीवर त्याच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच्या आईने सांगितले की, आमचे कुटुंब खूप आनंदी आहे. मी सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे. त्यांनी संपूर्ण जम्मू-काश्मीरचा अभिमान वाढवला आहे.
दुसरीकडे, 11वी रँक मिळवणाऱ्या 24 वर्षीय प्रसनजीत कौरने जम्मू विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी केले आहे. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. पूंछ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौर हिला मुलांना शिकवण्याची आवड आहे. प्राणीशास्त्र हा तिचा ऐच्छिक विषय होता.
तीन टप्प्यांत घेतली जाते परीक्षा
दरम्यान, यूपीएससीद्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यांत घेतली जाते, ज्यामध्ये उमेदवारांना प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातून जावे लागते. या परीक्षेद्वारे, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह इतर सेवांच्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते.