Upsc Result : शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं, लेकीनं UPSC परीक्षेत 323 वी रँक घेत यश मिळवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 08:58 AM2021-09-25T08:58:19+5:302021-09-25T08:58:36+5:30
Upsc Result : सीरसा माचीपूर येथील हिमानी मीना हिने 323 वी रँक मिळवत युपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे, गावकऱ्यांना अत्यानंद झाला असून एका शेतकऱ्याच्या लेकीनं युपीएससी परीक्षेत मिळवलेलं यश कौतुकाचा विषय ठरत आहे.
नवी दिल्ली - युपीएससीच्या लोकसेवा परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला असून सर्वसामान्य कुटुंबातील अनेक उमेदवारांनी यश मिळवलं आहे. या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारचा शुभम कुमार परीक्षेत पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे. उत्तर प्रदेशमधील जेवरच्या सिरसा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीने 323 वी रँक मिळवत दैदिप्यमान यश पटकावले.
सीरसा माचीपूर येथील हिमानी मीना हिने 323 वी रँक मिळवत युपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे, गावकऱ्यांना अत्यानंद झाला असून एका शेतकऱ्याच्या लेकीनं युपीएससी परीक्षेत मिळवलेलं यश कौतुकाचा विषय ठरत आहे. हिमानीने दिल्ली विद्यापीठातून बीएची परीक्षा पास केल्यानंतर जेएनयुमध्येच विदेश विषयांत मास्टर आणि पीएचडी केली आहे. हिमानीचे वडिल शेतकरी असून आई गृहिणी आहे. हिमानीने जेवर आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव रोशन केल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
हिमानीच्या कुटुंबीयांनी सांगितले के, तिला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते. तिने 12 वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच प्रज्ञान पब्लीक स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर, पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत गेल्यानंतर तिने सुरुवातीपासूनच युपीएससी परीक्षेचं आपलं ध्येय लक्षात ठेवून अभ्यास केला. आज तिने यश मिळवत स्वत:चं स्वप्न पूर्ण केलंय.
२१६ विद्यार्थीनी पास
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे.