प्रेरणादायी! वडिलांच्या अंत्यसंस्कारास जाण्यासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय 'तो' झाला IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:11 PM2023-01-09T12:11:37+5:302023-01-09T12:19:10+5:30
आर्थिक विवंचनेमुळे आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागल्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही.
देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी पदांपैकी एक असलेलं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न लाखो तरुणांचे आहे. त्यापैकी फारच कमी लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. काहींच्या संघर्षाची गोष्ट कळल्यावर कडक सॅल्यूट करावासा वाटतो. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचीही अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. आपल्या सर्व अडचणींना मागे टाकून त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि त्यात यशही मिळविले.
आयएएस अधिकारी रमेश घोलप यांना लहानपणी पोलिओची लागण झाली होती. लहानपणी त्यांना डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागल्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही. शेवटी ते जिद्दीने IAS अधिकारी झाले. IAS रमेश घोलप यांच्या वडिलांचे सायकलचे छोटेसे दुकान होते. वडिलांना दारू पिण्याची वाईट सवय होती. त्यांच्या या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आलं.
आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या
एके दिवशी वडिलांनी जास्त मद्यपान केल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण भार त्यांची आई आणि त्यांच्या खांद्यावर पडला. पोलिओग्रस्त असूनही त्यांनी आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या. रमेश घोलप यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावातून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते आपल्या काकांच्या घरी गेले. वडिलांचं निधन झालं तेव्हा रमेश बारावीत शिकत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते.
कोणतही कोचिंग नाही
काकांच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंत जाण्याचे भाडे फक्त 7 रुपये होते. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. बारावीनंतर रमेश घोलप यांनी डिप्लोमा केला आणि गावातील शाळेत शिक्षक झाले. मात्र, त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि बी.ए.ची पदवी पूर्ण केली. पण यूपीएससीच्या तयारीसाठी सहा महिने नोकरी सोडावी लागली. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा UPSC नागरी सेवा परीक्षा दिली. मात्र यात यश आले नाही. कोणतही कोचिंग घेतलं नाही. कठोर परिश्रमामुळे त्यांना अखेर 2012 मध्ये यश मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"