अनाथाश्रमात बालपण, शिपाई म्हणून नोकरी; आज आहेत IAS अधिकारी; जाणून घ्या, सक्सेस स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:28 PM2022-10-14T12:28:54+5:302022-10-14T12:36:36+5:30
घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या विकायला सुरुवात केली.
अपयशाला आपलं दुर्दैव मानून अनेक लोक प्रयत्न सोडून देतात पण असे अनेक लोक आहेत जे परिस्थितीसमोर खंबीरपणे उभे राहतात आणि जगाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देतात. अशा लोकांपैकी एक म्हणजे मोहम्मद अली शिहाब. केरळचे रहिवासी असलेले मोहम्मद शिहाब यांची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. अनाथाश्रमात राहणाऱ्या शिहाब यांची यशोगाथा जाणून घेऊया.
मोहम्मद शिहाब यांचा जन्म 15 मार्च 1980 रोजी केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात झाला. शिहाब यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव कोरोट अली आणि आईचे नाव फातिमा होते. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शिहाब यांनी वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या आणि खाऊची पानं विकायला सुरुवात केली. पण याच दरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शिहाब आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली.
आई शिकलेली नसल्याने तिला कोणतीच नोकरी मिळाली नाही. आपल्या मुलांचं पोट भरून न शकल्याने आणि गरिबीमुळे आईने शिहाब आणि त्यांच्या भावंडांना अनाथाश्रमात सोडलं. पण अनाथाश्रम ही अशी जागा होती जिथे शिहाब यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अनाथाश्रमात राहताना त्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळले आणि ते तेथील इतर मुलांपेक्षा हुशार झाले. त्यांनी अनाथाश्रमात 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या मेहनतीने 2011 मध्ये UPSC मध्ये 226 रँक मिळवून यश मिळवले.
तिसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी
तिसर्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे मोहम्मद शिहाब हे सध्या नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात पण अनेक कारणांमुळे यश मिळण्यापासून वंचित राहतात. मोहम्मद शिहाब यांचा हा प्रवास त्या सर्व उमेदवारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.