कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:02 PM2024-11-06T18:02:48+5:302024-11-06T18:07:57+5:30
beno zephine : बेनो जेफीन यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. आयुष्यात अनेक अडचणी आल्या तरी काही जण हार मानत नाहीत. आपल्या जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. बेनो जेफीन यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बेनो या भारतातील पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी आहेत. २०१५ मध्ये त्यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्वॉईन केली आहे.
चेन्नईच्या रहिवासी असलेल्या बेनो जेफीन UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी त्यांचं वय अवघं २५ वर्षे होतं. त्यांनी इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट केलं होतं आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम केलं आहे. बेनो यांना जन्मापासूनच दिसत नव्हतं.
बेनो जेफीन यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला, त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे. जन्मापासून दिसत नसलेल्या बेनो अभ्यासात अतिशय हुशार होत्या. सुरुवातीला ब्रेल लिपीत शिकल्यानंतर त्यांनी जॉब एक्सेस विथ स्पीच (JAWS) सॉफ्टवेअरचा वापर केला. या सॉफ्टवेअरच्या मदतीने जे लोक पाहू शकत नाहीत ते अभ्यास करू शकतात. बेनो यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनीही खूप मदत केली.
बेनो आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या पालकांना देतात. २०१३ मध्ये बेनो यांनी यूपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर जून २०१४ मध्ये त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली. ३४८ रँक मिळवला होता. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.