‘यूपीएससी’वरून संसदेत गदारोळ

By admin | Published: August 2, 2014 03:34 AM2014-08-02T03:34:45+5:302014-08-02T03:34:45+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी-सॅट परीक्षेवरून विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

'UPSC' threatens Parliament | ‘यूपीएससी’वरून संसदेत गदारोळ

‘यूपीएससी’वरून संसदेत गदारोळ

Next

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी-सॅट परीक्षेवरून विरोधकांनी संसद दणाणून सोडली. लोकसभेत एका सदस्याने आक्रमक पवित्रा घेत वर्तमानपत्राची फाडाफाड करून ते अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले, तर राज्यसभेत सरकारने हा मुद्दा ठराविक कालमर्यादेत सोडविण्यास नकार दिल्याने समस्त विरोधकांनी सभात्याग करून या मुद्यावर एकीचे दर्शन घडविले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या मुद्यांवरून जोरदार गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज भोजनावकाशाआधी तीन वेळा तहकूब करावे लागले.
सत्तारूढ सदस्यांना चिथावणी देत कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना चांगलेच धारेवर धरले.
यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार अत्यंत गंभीर असून सरकार सर्व पैलूंवर विचार करीत आहे. या मुद्यांवर (सी-सॅट) नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल एक दिवसापूर्वीच मिळाला असून त्यावर अभ्यास केला जात आहे. लवकरात लवकर हा मुद्दा मार्गी लावण्याची सरकारची इच्छा आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही. हा मुद्दा सोडविण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी करीत विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
दुसरीकडे लोकसभेत राजदचे राजेश रंजन हाताने वर्तमानपत्र उंचावत अध्यक्षांच्या आसनापुढील हौदात उतरले. या मुद्यांवर सरकारने निवेदन करण्याची जोरदार मागणी करीत त्यांनी नंतर हातातील वर्तमानपत्र फाडून ते अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले.
हा मुद्यावर आठवडाभरात निवेदन करण्याचे सरकारनेच स्पष्ट केले होते. तथापि, ही मुदतही संपली, याकडे राज्यसभेत विरोधकांनी लक्ष वेधले असता कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, समितीचा अहवाल आजच मिळाला. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून त्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या अहवालावर अभ्यास करण्याइतपत तरी मुदत द्या. सरकारने मागितलेली मुदत संपल्याची कबुलीही त्यांनी दिली. गृहमंत्री राजनाथसिंग आणि कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत समाजवादी पार्टी, बसपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'UPSC' threatens Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.