यूपीएससी टॉपर टीनाला अवघे ५२%
By admin | Published: May 16, 2016 03:54 AM2016-05-16T03:54:55+5:302016-05-16T03:54:55+5:30
टीना दाबी या २२ वर्षीय विद्यार्थिनीला अवघे ५२.४९ टक्के गुण मिळाले असून त्यातून यूपीएससीने मूल्यांकनासाठी लावलेले कठोर निकष उघड झाले
नवी दिल्ली : सनदी सेवा परीक्षेत देशभरातून अव्वल आलेल्या टीना दाबी या २२ वर्षीय विद्यार्थिनीला अवघे ५२.४९ टक्के गुण मिळाले असून त्यातून यूपीएससीने मूल्यांकनासाठी लावलेले कठोर निकष उघड झाले आहे.
देशभरातील उच्च सनदी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षी प्राथमिक (प्रिलिमिनरी), मेन( मुख्य) आणि मुलाखती अशी तीन टप्प्यात ही परीक्षा पार पाडली जात असून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), इंडियन फॉरेन सर्व्हिस(आयएफएस) आणि इंडियन पोलीस सेवेसाठी (आयपीएस) निवड केली जाते. टीना ही दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजची पदवीधर असून तिने २०१५ च्या परीक्षेत एकूण १०६३ म्हणजे ५२.४९ टक्के गुण मिळविले आहेत. एकूण २०२५ गुणांपैकी १७५० मुख्य परीक्षा तर २७५ गुण मुलाखतीचे असतात. (वृत्तसंस्था)
>एकूण १०८७ उमेदवारांची निवड
६ मे रोजी घोषित झालेल्या निकालानुसार नियुक्तीसाठी शिफारस झालेले एकूण उमेदवार १०७८ असून त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीतील ४९९, इतर मागासवर्गीय ३१४, अनुसूचित जाती-१७६, अनुसूचित जमाती-८९ यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या जम्मू-काश्मीरच्या अथार आमीर उल शफी खान यांनी १०१८ गुण (५०.२७ टक्के) तर तिसऱ्या क्रमांकावरील जसमीतसिंग संधू यांनी १०१४( ५०.०७ टक्के) गुण मिळविले आहेत. खान हे रेल्वे वाहतूक सेवेत अधिकारी आहेत. संधू ह्या महसूल सेवा (सीमा शुल्क आणि केंद्रीय अबकारी) अधिकारी आहेत.