'भाजपाने विश्वासघात केला'; आणखी एका पक्षाकडून NDA ला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 10:04 PM2018-03-24T22:04:33+5:302018-03-24T22:04:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सोबत घेऊन आमच्या विकासाचे आश्वासन दिले होते.
नवी दिल्ली: चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम (टीडीपी) पक्षाने भाजपप्रणित NDA ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शनिवारी आणखी एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडली. भाजपाने आमचा विश्वासघात केला आहे, असा आरोप गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख एल.एम. लामा यांनी केला. आता आमचे भाजपाशी कोणतेही संबंध उरलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आमचे गोरखा जनमुक्ती मोर्चाशी फक्त निवडणुकीपुरेतच संबंध असल्याचे विधान केले होते. तेव्हापासून गोरखा जनमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते भाजपावर नाराज होते.
दार्जिलिंग लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जसवंत सिंह यांना गोरखा जनमुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला होता. परंतु त्यानंतर भाजपने लोकांना धोका दिला असून भाजपमुळेच दार्जिलिंगमधील लोक अविश्वास व्यक करत असल्याचा आरोप एलएम लामा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सोबत घेऊन आमच्या विकासाचे आश्वासन दिले होते. मात्र युती फक्त निवडणुकांसाठी केली आहे हे ऐकून आम्हाला अतीव दुःख झाले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिलेले एकही आश्वासन पाळले नाही त्यामुळे आता एनडीएसोबत राहण्यात काहीही अर्थ नाही म्हणून आम्ही एनडीएतून बाहेर पडतो आहोत असेही लामा यांनी स्पष्ट केले. गोरखा जनमुक्ती मोर्चाने घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.