उरी हल्ल्याचा जगभर निषेध; दहशतवाद्यांवर कारवाई हवीच
By admin | Published: September 20, 2016 05:53 AM2016-09-20T05:53:45+5:302016-09-20T05:53:45+5:30
प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले.
नवी दिल्ली : प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले. काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गांनी तोडगा शोधणे महत्वाचे आहे, असे फ्रेंचच्या परराष्ट्र मंत्रालयाने येथे निवेदनाद्वारे म्हटले. फ्रान्सने उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स भारताबरोबर आहे, असे त्यात नमूद करण्यात आले.
पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उरी येथील हल्ल्याचा निषेध करून अपराध्यांना कठोर शिक्षा होईल व पुन्हा स्थैर्य निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.
काश्मीर खोऱ्यात वाढता हिंसाचार आणि तापत जाणाऱ्या वातावरणाबद्दल चीनने सोमवारी चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तानने मतभेद संवादाद्वारे व परस्परांत सहकार्य वाढवून सोडवावेत, असे आवाहनही केले. उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्हाला धक्का बसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध असून आम्ही दहशतवादाचा निषेध करतो. काश्मीर खोऱ्यात वाढलेला हिंसाचार आणि तापमान याची आम्हाला काळजी वाटते. संबंधित देश आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी संवाद व सल्लामसलतीद्वारे प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. त्यांना आपापसात दहशतवाद विरोधातील प्रयत्नांचे सहकार्यही वाढवावे लागेल. फक्त याच मार्गाने त्या भागात शांतता आणि सुरक्षितता स्थापन होईल, असेही कांग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>रशियाने रद्द केल्या पाकसोबतच्या संयुक्त कवायती
पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. पाकला एकटे पाडण्यासाठी भारतातर्फे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला रशियाच्या निर्णयाने यश मिळाले आहे.