उरी, पठाणकोटवरील हल्ल्यांच्या आठवणी झाल्या जाग्या; आता पुन्हा अशाच कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 06:11 AM2019-02-15T06:11:03+5:302019-02-15T06:11:37+5:30
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. उरी व पठाणकोट हल्ल्यांचा सूड उगविण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते.
दोन्ही हल्ल्यांत पाकिस्तानचा हात
बारामुल्ला जिल्ह्यात १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २१ जवान शहीद झाले. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले होते. आधी १ जानेवारी २०१६ रोजी पाक दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला होता. त्यात तीन जवान शहीद व सहा दहशतवादी ठार झाले.
नागरोटा येथील १६ कॉर्प्स मुख्यालयावर २९ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले होते.
शाळा, बँका, कार्यालयांना आगी
याखेरीज गेल्या २0 वर्षांत अतिरेक्यांनी काश्मीरमधील अनेक शाळांना आगी लावल्या, बँका लुटल्या वा त्या पेटवून दिल्या, एटीएम लुटली आणि सरकारी कार्यालयांनाही आगी लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. अशा प्रकारांची संख्या ३00 हून अधिक आहे.