एअर इंडियाच्या 'त्या' फ्लाइटमध्ये 9B सीटच नाही, लघुशंका प्रकरणाला नवा ट्विस्ट; वकिलाच्या दाव्यानं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:46 PM2023-01-20T16:46:52+5:302023-01-20T16:48:38+5:30
एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या एअरलाइन्सच्या निर्णयावर आरोपीच्या वकिलांनी असहमती व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली-
एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या एअरलाइन्सच्या निर्णयावर आरोपीच्या वकिलांनी असहमती व्यक्त केली आहे. आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी शुक्रवारी दावा केला की एअर इंडियानं आपल्या 'दोषपूर्ण' अहवालात गोष्ट रचली आहे. कारण शंकर मिश्रा यांनी सीट 9A वर बसलेल्या तक्रारदारावर लघुशंका केली हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण एअर इंडिया देऊ शकलेलं नाही, असा दावा आरोपीच्या वकिलांना केला आहे.
"विमान कंपनीनं कथा रचली आहे की शंकर मिश्रा सीट 9B वर बसले होते आणि त्या सीटवर उभे राहून त्यांनी 9A वर बसलेल्या प्रवाशावर लघुशंका केली, पण मूळात फ्लाइटमध्ये 9B सीटच नाही", असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
एअर इंडियाला ३० लाखांचा दंड
हवाई वाहतूक नियामक DGCA ने न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट दरम्यान एका प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याच्या घटनेच्या संदर्भात एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. DGCA ने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार ज्या दिवशी संबंधित घटना घडली त्या विमानाच्या मुख्य पायलटचा (पायलट इन कमांड) परवाना देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
यासोबतच, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एअर इंडियाला मिळाली होती नोटीस
४ जानेवारीला ही बाब डीजीसीएच्या निदर्शनास आल्यानंतर एअर इंडियाला नोटीस बजावण्यात आली. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियामकाने विमान कंपनीवर कारवाई केली आहे.
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट दरम्यान शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. एअर इंडियाने एक दिवस अगोदर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी विमान प्रवास करण्यास बंदी घातली होती. यापूर्वी, एअरलाइन्सने ३० दिवसांची प्रवास बंदी घातली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर मिश्रा यांना अटक करण्यात आली. आता आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. DGCA ने सांगितले की एअरलाइन्स व्यवस्थापनाने त्यांच्या नोटीसला पाठवलेल्या उत्तराची समीक्षा केली गेली आणि हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.