उरीचा हल्ला काही चुकांमुळेच झाला
By admin | Published: September 22, 2016 04:52 AM2016-09-22T04:52:17+5:302016-09-22T04:52:17+5:30
लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला
नवी दिल्ली : लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला हे उघड आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र याची पुनरावृत्ती न होऊ न देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही कबुली दिली. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने उरीमध्ये नेमके काय चुकले याच्या तपशिलात जाण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, माझ्या तत्वात कोणतीही चूक बसत नाही व अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण खात्री करायला हवी.
या हलल्याला कसे प्रत्तुत्तर द्यायचे याचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे सांगत पर्रिकर म्हणाले की, प्रसंगी कणखरपणे पावले जरूर उचलावी लागतात, पण आतताईपणाने कारवाईही केली जाऊ शकत नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. त्यामुळे अतिरेकी देशात घुसून हल्ले करत असताना तो झोपूनही राहू शकत नाही. वेळ पडली तर भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरणयच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी ोबलताना ते म्हणाले की, रिकामे भांडेच जास्त खडखडात करते. बलवानाला फारशी हुज्जत घालावी लागत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पाकिस्तानला पुरावे देणार
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून गरळ ओकण्याच्या तयारीत असताना भारताने त्या देशाचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले व उरी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे पुरावेच हवे असल्यास ते देण्याची तयारी दर्शविली. ठार झालेल्या हल्लेखोरांचे डीएनए नमुने व हाताचे ठसे आम्ही तात्काळ देऊ शकतो, असे बासित यांना सांगण्यात आले.