इसिसमध्ये सामील झालेला केरळचा नागरिक अमेरिकेच्या हल्ल्यात ठार
By admin | Published: April 30, 2017 05:05 PM2017-04-30T17:05:06+5:302017-04-30T17:31:53+5:30
गेल्या वर्षी कथित स्वरुपात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी गेलेला केरळमधील नागरिक अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 30 - गेल्या वर्षी कथित स्वरुपात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी गेलेला केरळमधील नागरिक अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.
सोशल मीडिया अॅप्लिकेशन टेलीग्रामच्या माध्यमातून याह्या कुटुंबीयांना याबाबत शनिवारी रात्री ही बातमी समजली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बी.सी.ए रहीमन यांनी दिली. "याह्या अमेरिकेच्या हल्ल्यात शहीद झाला", असा निरोप असफाक नावाच्या व्यक्तीने पाठवला.
"साह्या अमेरिकेच्या सैनिकांविरोधात लढताना मारला गेला",असेही आलेल्या निरोपात नमुद करण्यात आले आहे. मात्र तो कधी मारला गेला, याची माहिती देण्यात आलेली नाही. पलक्कड पोलिसांच्या स्पेशल ब्रान्चने या वृत्ताला दुजोरा दिला नाही, मात्र निरोप मिळाल्याचा उल्लेख केला आहे.
याह्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. मध्य पूर्वेत जाऊन बेपत्ता झालेल्या 21 लोकांमध्ये याह्याचा समावेश होता. या लोकांनी सिरीयात इस्लामिक स्टेटचं सदस्यत्व स्वीकारले होते, असे बोलले जाते.
दरम्यान, 15 दिवसांपूर्वी पलक्कड जिल्ह्यातलाच पाडना भागातला मुर्शीद मोहम्मद अफगाणिस्तानात ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता.
दरम्यान, इस्लामिक स्टेटसोबत तरुण जोडले जात असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही जणांविरोधात अटकेचीही कारवाई करण्यात आली.
तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी इसिसच्या म्होरक्या नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा फेसबूक, सोशल मीडियावरील जिहादबाबतच्या पोस्ट, माहितीमुळे प्रभावित झाल्याचे उत्तरप्रदेश एटीएसने त्याच्या केलेल्या चौकशीतून उघडकीस आले. उत्तर प्रदेश एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली विशेष शाखा, आंध्रप्रदेश सीआय शाखेसह तब्बल नऊ पथकांनी पाच राज्यांमध्ये कारवाई करून मुंब्य्रातील नजीम याच्यासह उत्तर प्रदेशातील बिजनौर आणि पंजाबमधील लुधियानातून चार दहशतवाद्यांना १९ एप्रिलला बेड्या ठोकल्या. तसेच सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत तसेच गोळा केलेल्या पुराव्यानुसार इसिसचा म्होरक्या असलेल्या नजीम टोळीत नवीन सदस्य जोडणीचे, त्यांच्यासाठी पैसा उभा करणे, तरुणांची साखळी वाढविणे आदी कामे करत होता.
सौदी अरेबीयातील दमाम येथे दोन वर्षे प्लंबरची नोकरी करून त्यानंतर तो भारतात परतला होता. त्यानंतर पुन्हा २०१५ मध्ये तो सौदी अरेबियातील हबाब मक्कामध्ये नोकरीसाठी गेला. तेथे दीड वर्षे राहिला. दरम्यानच्या काळात फेसबूक, अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवरील जिहादचे व्हीडिओ क्लीप, विविध पोस्टर पाहून तो प्रभावित झाला. यातूनच तोही त्यावर स्वत:ची मते मांडू लागला. याच दरम्यान त्याचा इसिससोबत संपर्क वाढला. आणि तो त्यांच्यासाठी काम करु लागल्याचे समोर आले आहे.
हबाब मक्कामध्ये एक वर्ष वास्तव्याचा परवाना मिळाला असताना जास्त काळ राहिल्याने तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. १८ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर तेथील तपास यंत्रणांनी त्याला पुन्हा भारतात पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.