अमेरिकेला मणिपूर हिंसाचाराची चिंता; मदत मागितल्यास आम्ही तयार- राजदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 08:11 AM2023-07-08T08:11:36+5:302023-07-08T08:11:45+5:30
गार्सेटी म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे.
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. भारताने मदत मागितल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे. मात्र, यावर अमेरिकेने यात हस्तक्षेपाची गरज नसल्याचे म्हणत भारताने फटकारले आहे.
गार्सेटी म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्हाला लवकरात लवकर शांतता अपेक्षित आहे. आम्हाला तिथल्या परिस्थितीबद्दल कोणतीही धोरणात्मक चिंता नाही. आम्हाला लोकांची चिंता आहे, असेही ते म्हणाले. कोलकाता येथील कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने त्यांना मणिपूरवर प्रश्न विचारला. प्रत्युत्तरात गार्सेट्टी यांनी वरील गोष्टी सांगितल्या. मणिपूरच्या मुलांबद्दल आणि तिथे मृत्युमुखी पडत असलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी भारतीय असण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
‘नागरिक आपल्याच देशात निर्वासित’
भाजपने मणिपूरमधील लोकांना निराश केले असून, त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित होण्यास भाग पाडले आहे, असा आरोप सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम यांनी केला. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील नागरिकांप्रति एकता व्यक्त करण्यासाठी माकपा, भाकपा खासदारांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून विश्वम गुरुवारी मणिपूरला आले होते. भाजपने मणिपूरची घोर निराशा केली आहे. या विश्वासघाताची किंमत त्याला चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.