अमेरिकेची कारवाई सुरुच; अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी उद्या दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:29 IST2025-02-14T18:28:33+5:302025-02-14T18:29:26+5:30
US Deport Immigrants : गेल्या आठवड्यात अमेरिकेने 104 अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले होते.

अमेरिकेची कारवाई सुरुच; अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी उद्या दाखल होणार
US Deport Indian Immigrants : दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली इमिग्रेशन पॉलिसी आणखी कडक केली आहे. यानुसार, अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांना सक्तीने आपापल्या देशात पाठवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच 104 अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवण्यात आले. आता अवैध भारतीयांची आणखी एक खेप भारतात पाठवली जात आहे. उद्या(15 फेब्रुवारी) रात्री 10:05 वाजता हे विमान अमृतसर विमानतळावर लँड करेल.
कोणत्या राज्यातील किती?
मीडिया रिपोट्सनुसार, या विमानात 119 अवैध भारतीय स्थलांतरित नागरिक असतील. त्यापैकी 67 प्रवासी पंजाब, 33 हरियाणा आणि 19 गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील असतील. अमेरिकेतून येणाऱ्या या विशेष विमानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला लेखी माहिती देण्यात आली आहे.
5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतून पहिले विमान आले
गेल्या आठवड्यात बुधवारी (5 फेब्रुवारी) अमेरिकन हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर लष्करी विमान 104 अवैध भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले होते. त्यात 79 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्या विमानातील सर्व अवैध भारतीय स्थलांतरितांना बेडीत बांधून ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला. यावरुन विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आता दुसरी तुकडी कशारितीने भारतात परत येते, हे पाहणे महत्वाचे आहे.