३० लाख दिले, ६ महिने प्रवास केला अन् १५ दिवसांपूर्वीच अमेरिकेत पोहचताच बेड्या ठोकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:33 IST2025-02-06T09:32:15+5:302025-02-06T09:33:11+5:30
याच जानेवारी महिन्यात अमेरिकेत पोहचलो होतो. तिथे ११ दिवस राहिलो, ते सर्व दिवस जेलमध्येच होतो असं त्याने धक्कादायक अनुभव सांगितला.

३० लाख दिले, ६ महिने प्रवास केला अन् १५ दिवसांपूर्वीच अमेरिकेत पोहचताच बेड्या ठोकल्या
पंजाबच्या फतेहगडचा जसपास सिंग २४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमेरिकेत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचं स्वप्न घेऊन भारतातून रवाना झाला. थोडेफार पैसे, विश्वास आणि उज्ज्वल भवितव्य हे सर्व पणाला लावून तो अमेरिकेला निघाला परंतु चांगली सुरूवात होण्याऐवजी त्याला ताब्यात घेऊन डिपोर्टेशन करण्यात आलं. यात जसपालनं त्याच्या आयुष्याची कमाई गमावली आणि स्वप्नही मोडलं.
जसपाल त्या १०४ भारतीयांपैकी एक आहे ज्यांना बुधवारी अमेरिकन लष्करी विमानाने भारतात सोडण्यात आले. हे सर्व १०४ भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांविरोधात मोहिम हाती घेतली तेव्हापासून अमेरिकेत कुठल्याही परवान्याशिवाय राहणाऱ्यांवर पुन्हा भारतात पाठवण्याची कारवाई सुरू झाली. ट्रम्प प्रशासन अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या नागरिकांना त्या त्या देशात पाठवत आहेत.
जसपाल सिंगला कायदेशीरपणे अमेरिकेत राहायचे होते. त्यासाठी त्याने एजेंटला ३० लाख रूपये दिले होते मात्र एजेंटने त्याची फसवणूक केली. पीटीआयशी बोलताना जसपालने सांगितले की, अमेरिकेत जाण्यासाठी एजेंटसोबत माझा करार झाला होता. तो मला व्हिसासह कायदेशीर मार्गाने अमेरिकेत पाठवणार होता परंतु माझा विश्वासघात झाला. हा करार ३० लाखांचा होता. माझे सर्व पैसे बुडाले. एजेंटने मला पंजाबमधून युरोपला पाठवले. मी कायदेशीरपणे चाललोय असं मला वाटत होते. तिथून मला ब्राझीलला पाठवले आणि त्यानंतर मला डंकी रूटवर नेले. डंकी रूटमार्गे अमेरिकेला पोहचण्यासाठी ६ महिने लागले. त्यानंतर जसं आम्ही बॉर्डर पार करून अमेरिकेत दाखल झालो तेव्हा तिथे तैनात असणाऱ्या जवानांनी आम्हाला अटक केली. याच जानेवारी महिन्यात अमेरिकेत पोहचलो होतो. तिथे ११ दिवस राहिलो, ते सर्व दिवस जेलमध्येच होतो असं त्याने धक्कादायक अनुभव सांगितला.
हातापायात बेड्या बांधून आणलं
दरम्यान, जेव्हा मला सैन्य विमानात बसवलं तेव्हा कुठल्यातरी डिटेंशन सेंटरला आम्हाला नेण्यात येतंय असं वाटलं. आम्हाला पुन्हा भारतात पाठवणार हे माहिती नव्हते. एका अधिकाऱ्याने भारतात चाललोय हे सांगितले. हातापायात बेड्या बांधून आम्हाला अमेरिकेतून बाहेर काढण्यात आले. अमृतसरला पोहचल्यानंतर बेड्या काढण्यात आल्या असं जसपाल सिंग याने सांगितले.